सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले विराट-शिखर
नवी दिल्ली : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. खरंतर अनेकदा अशा व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे फायदेही होतात.
अशाच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन भारताचा कर्णधार विराट कोहली आणि गब्बर शिखर धवनने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केलीये. हा व्हायरल झालेला व्हिडीओ एका चिमुरडीचा आहे.
यात त्या मुलीला १ ते ५ अंक बोलण्यास सांगितलंय. तिचे वय अवघे २-३ वर्ष इतकेच असावे. ती चिमुरडी रडत रडतच अंक म्हणतेय. अंक म्हणताना चुकलेल्या या चिमुरडीला चक्क थोबाडीतही मारल्याचे व्हिडीओत दिसतेय.
हा व्हिडीओ कर्णधार कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. तसेच हा व्हिडीओ शेअऱ करताना त्याने प्रचंड नाराजीही व्यक्त केलीये. हा धक्कादायक व्हिडीओ आहे. लहान मुलांना अशी भिती दाखवून शिकवल्यास ते कधीही शिकणार नाहीत. हा व्हिडीओ पाहून फारच दु:ख झालेय, असं त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर म्हटलंय.
विराटसह शिखर धवननेही हा व्हिडीओ त्याच्या अकाऊंटवर शेअर केलाय. त्यानेही याबाबत नाराजी व्यक्त करताना, एक आई-वडिल म्हणून आपल्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर आहे. हा व्हिडीओ फारच धक्कादायक आहे. पाचपर्यंत अंक म्हणू शकत नाही म्हणून ती महिला त्या चिमुरडीला असा त्रास देतेय हे खरंच विचलित करणारे आहे