`या` कारणामुळे विराट कोहली आणि अंपायरमध्ये बाचाबाची!
दक्षिण आफ्रिका मैदानावर उतरली असता कोहलीची अंपायरसोबत बाचाबाची झाली.
मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात असून टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान सेंच्युरियनच्या मैदानावर चौथ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची अनेकदा बाचाबाची होताना दिसली. 305 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिका मैदानावर उतरली असता कोहलीची अंपायरसोबत बाचाबाची झाली.
दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावासाठी मैदानात उतरली. टीम इंडियानेही फिल्डींग लावली होती. मात्र त्यावेळी कोहलीने खेळ थांबवला आणि सांगितलं की, त्यांना जो बॉल देण्यात आला आहे तो जुना आहे. शिवाय यावेळी बॉल निवडण्यासाठी संधी दिली नसल्याचंही कोहलीने म्हटलं.
अश्विनने निवडला नवा बॉल
यानंतर अंपायरने बॉलचा बॉक्स मागवला आणि टीम इंडियाला बॉल निवडण्यासाठी सांगितलं. यावेळी कोहलीसोबत स्पिनर रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज देखील होते. यावेळी अश्विनने बॉल निवडला आणि मॅचला सुरुवात केली.
गावस्करने सांगितलं कारण
यावेळी भारतीय दिग्गज सुनील गावस्कर कॉमेंट्री करत होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, प्रत्येक बॉलचा आकार, रंग आणि वजन खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकामध्ये मोठा फरक असतो. यामुळेच टीम इंडियाला नवा बॉल हवा होता.
आमच्या काळात फक्त कपिल देवच चेंडू निवडायचे, असंही सुनील गावस्कर यांनी सांगितलं.