आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराट, चेतेश्वरची घसरण
विराट कोहलीचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ९०० रेटिंगच्या आकड्याला स्पर्श करण्याचे स्वप्न केपटाऊनमध्ये उद्ध्वस्त झाले.
दुबई : विराट कोहलीचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ९०० रेटिंगच्या आकड्याला स्पर्श करण्याचे स्वप्न केपटाऊनमध्ये उद्ध्वस्त झाले.
पहिल्या सामन्यातील पराभवामुळे विराट कोहली वर्ल्ड रँकिंगमध्ये एका स्थानाने घसरुन तिसऱ्या स्थानावर घसरलाय. चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय आणि रोहित शर्मा या फलंदाजांनाही न्यूलँड्सच्या मैदानावर खराब प्रदर्शनाचे परिणाम भोगावे लागलेत.
दरम्यान, इतर फलंदाजांची घसरण होत असताना भुवनेश्वर कुमारने मात्र करिअरमधील सर्वोत्कृष्ट रँकिंग मिळवलीये. मोहम्मद शामी रँकिंगमध्ये पहिल्या २०मध्ये स्थान मिळवणारा तिसरा गोलंदाज ठरलाय. द. आफ्रिकेचा गोलंदाज कॅगिसो रबाडा पहिल्या स्थानावर आहे.
कोहलीचे या सामन्याआधी ८९३ अंक होते. त्याचा फॉर्म पाहता तो ९००चा आकडा पार करेल असे वाटत होते. मात्र पहिल्या सामन्यात कोहलीने ५ आणि २६ धावा केल्या. ज्यामुळे त्याचे ८८० अंक झाले आणि तो तिसऱ्या स्थानावर घसरला.
पुजाराने या कसोटीत २६ आणि ४ धावा केल्या. त्यामुळे त्याचे २५ अंकाचे नुकसान झाल्याने तो ८४८ अंकासह तिसऱ्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर घसरलाय.
आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी साफ निराशा केली असली तरी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भुवनेश्वरने या सामन्यात चांगली कामगिरी करत रँकिंगमध्ये ८ स्थानांनी झेप घेत २२वे स्थान मिळवलेय. हे त्याचे करिअरमधील सर्वश्रेष्ठ रँकिंग आहे. सामन्यात चार विकेट घेणारा शामी १९व्या स्थानी पोहोचलाय.