२ वर्षांमध्येच विराट सचिनचं रेकॉर्ड मोडणार!
सचिन तेंडुलकरचं नाव घेतल्यानंतर त्याच्या सर्वाधिक रन आणि सर्वाधिक शतकांचं रेकॉर्ड डोळ्यासमोर येतं.
मुंबई : सचिन तेंडुलकरचं नाव घेतल्यानंतर त्याच्या सर्वाधिक रन आणि सर्वाधिक शतकांचं रेकॉर्ड डोळ्यासमोर येतं. पण आता सचिनचं वनडे क्रिकेटमधलं सर्वाधिक शतकांचं रेकॉर्ड फार काळ टिकेल, असं दिसत नाही. सचिनच्या नावावर वनडेमध्ये ४९ शतकांची नोंद आहे. पण विराट कोहली लवकरच हे रेकॉर्ड तोडेल असंच म्हणावं लागेल. विराटनं २०१८मध्ये ५ शतकं केली आहेत. याच गतीनं विराट खेळत राहिला तर तो दोन वर्षांमध्येच सचिनचं सर्वाधिक शतकांचं रेकॉर्ड मोडेल.
२०१८चा सगळ्यात यशस्वी बॅट्समन विराट
२९ वर्षांचा विराट कोहली २०१८ सालचा सगळ्यात यशस्वी बॅट्समन आहे. वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येकी १ हजार रन करणारा विराट एकमेव बॅट्समन आहे. विराटनं यावर्षी वनडेमध्ये १०४६ रन आणि टेस्टमध्ये १०६३ रन केले आहेत. दोन्ही फॉरमॅटमध्ये विराटच्या नावावर ९ शतकं आहेत. टी-२०मध्ये मात्र विराटला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. यावर्षी ७ टी-२० इनिंगमध्ये विराटनं १४६ रन केले आहेत.
विराटची प्रत्येक मोठी खेळी मोडतेय सचिनचं रेकॉर्ड
एक असा काळ होता जेव्हा सचिन मैदानात उतरायचा तेव्हा रेकॉर्ड बनायचं. आता हीच गोष्ट विराटच्या बाबतीतही घडत आहे. विराटनं यावर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये २२५५ रन केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागोपाठ ३ वर्ष २ हजार रनपेक्षा जास्त करणारा विराट जगातला तिसरा खेळाडू आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि मॅथ्यू हेडननं हे रेकॉर्ड केलं होतं.
विराटचं पुढचं लक्ष्य ५० शतकं
सचिनच्या नावावर वनडेमध्ये तीन मोठे रेकॉर्ड आहेत. सर्वाधिक ४६३ मॅच, सर्वाधिक १८,४२६ रन आणि सर्वाधिक ४९ शतकं सचिनच्या नावावर आहे. विराटनं आत्तापर्यंत २१३ मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं ३७ शतकं आणि १०,०७६ रन केले आहेत. सर्वाधिक मॅच आणि सर्वाधिक रनचं रेकॉर्ड मात्र अजून त्याच्यापासून लांब आहे. पण सध्याचा फॉर्म बघता विराट सचिनचं ४९ शतकांचं रेकॉर्ड दोन वर्षात मोडेल. विराट वनडे क्रिकेटमध्ये ५० शतकं करणारा पहिला खेळाडू बनू शकतो. कोहलीनं मागच्या २२ महिन्यांमध्ये ११ वनडे शतकं केली आहेत.
विराटची १० वर्षात ३७ शतकं
विराटनं १० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३७ शतकं केली आहेत. म्हणजेच तो वर्षाला सरासरी ४ शतकं करत आहे. विराट शतकांच्या बाबतीत सचिनपासून १२ शतकं पिछाडीवर आहे. त्यामुळे विराटला सचिनचं रेकॉर्ड मोडायला ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो.
२१३ मॅचनंतर विराट आणि सचिन
२००८ साली पदार्पण करणाऱ्या विराटनं १० वर्षात २१३ वनडे खेळल्या आहेत. विराटनं ५९.६२ च्या सरासरीनं १०,०७६ रन केले आहेत. यामध्ये ३७ शतकं आणि ४८ अर्धशतकं आहेत. विराटच्या नावावर सगळ्यात जलद ८ हजार, ९ हजार आणि १० हजार रन करण्याचा विक्रम आहे. १९८९ साली पदार्पण करणाऱ्या सचिननं २१३ वनडे खेळल्यानंतर ७,९६९ रन होते. यामध्ये २२ शतकांचा समावेश होता. म्हणजेच कारकिर्दीच्या मध्यावर असलेल्या विराटचे आकडे सचिनपेक्षा जास्त चांगले आहेत.