...म्हणून विरुष्काने वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवलंय, विराटकडून खुलासा
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना 11 जानेवारीला कन्यारत्न प्राप्त झालं होतं.
मुंबई : टीम इंडिया (Team India) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. याआधी भारतीय खेळाडू सध्या मुंबईत क्वारंटाईन आहेत. भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अजिंक्यपदासाठी भिडणार आहे. हा सामना साऊथम्पटनमध्ये 18-22 जूनदरम्यान खेळवण्यात येणार आहे. या इंग्लंड दौऱ्यावर विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही सोबत जाणार आहे. विरुष्काला या वर्षाच्या सुरुवातीलाच 11 जानेवारीला कन्यारत्न प्राप्त झालं होतं. विरुष्काने (Virushka) आपल्या मुलीचं वामिका (Vamika) असं नामकरण केलं. दरम्यान अजूनही विरुष्काने वामिकाचा फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेला नाही. वामिकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर का करत नाही, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विराटला प्रश्न विचारला. त्यावर विराटने त्यामागचं कारण सांगितलं. (Virat Kohli disclosed the reason for keeping vamika away from social media)
विराट काय म्हणाला?
"वामिकाला जेव्हापर्यंत सोशल मीडियाची समज येत नाही, आणि आपल्यासाठी काय योग्य-अयोग्य आहे हे तिला समजत नाहीत, तोपर्यंत तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला आहे, असं विराटने नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं. विराट इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत संवाद साधत होता. यादरम्यान त्याने हे उत्तर दिलं. तसंच विराटने वामिका या शब्दाचा अर्थही सांगितला. "वामिका म्हणजेच दुर्गा देवीचं दुसरं नाव आहे", असं विराटने स्पष्ट केलं. विराटने मुलीच्या जन्मासाठी कुटुंबियांसोबत उपस्थित राहता यावे, यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पहिल्या कसोटीनंतर माघार घेतली होती.
ज्योतिषीचं भाकित खरं ठरलं
विरुष्काला कन्यारत्नच होणार, अशी भविष्यवाणी बंगळुरुमधील एका ज्योतिषीने केली होती. हे भाकित खरं ठरलं. त्या ज्योतिषीने ज्योतिषशास्त्रीय कॅलक्युलेशनच्या आधारावर ही भविष्यवाणी केली होती.
असा आहे टीम इंडियाचा इंग्लंड दौरा
टीम इंडिया या इंग्लंड दौऱ्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दोन हात करणार आहे. हा सामना 18-22 जूनदरम्यान खेळवण्यात येणार आहे. यानंतर विराटसेना इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.