मुंबई : श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज भारतानं ५-०नं जिंकली आहे. भारताच्या या विजयाबरोबरच कॅप्टन विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. या सीरिजमध्ये दोन शतकं लगावल्यामुळे विराटनं २६ पॉईंट्सनं उसळी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी रॅकिंगमध्ये विराट कोहलीचे सध्या ८८७ पॉईंट्स आहेत. वनडे रॅकिंगमध्ये सर्वाधिक पॉईंट्स कमावणाऱ्या भारतीयांमध्ये विराटनं आता सचिनची बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरनं १९९८मध्ये एवढे पॉईंट्स बनवले होते.


श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वनडेमध्ये कोहलीनं शतक लगावून रिकी पॉटिंगच्या वनडे क्रिकेटमधल्या ३० शतकांची बरोबरी केली आहे. आता तो फक्त भारताचा  दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आहेत. सचिन तेंडुलकरनं ४५२ इनिंग्समध्ये ४९, रिकी पॉटिंगनं ३६५ इनिंगमध्ये ३० तर विराटनं फक्त १८६ इनिंगमध्येच ३० शतकं पूर्ण केली आहेत.


टॉप १० मध्ये एवढे भारतीय खेळाडू 


कोहलीबरोबरच या सीरिजमध्ये दोन शतकं मारणारा रोहित शर्मा नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर सीरिजमध्ये १६२ रन्स बनवणारा धोनी दहाव्या क्रमांकावर आहे. सीरिजमध्ये १५ विकेट घेणारा बुमराह चौथ्या क्रमांकावर आहे. आयसीसीच्या या रॅकिंगमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर दक्षिण आफ्रिका पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.