विराट कोहलीकडे धोनीचे हे २ महान रेकॉर्ड मोडण्याची संधी
भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली टीम इंडियामध्ये परतला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली टीम इंडियामध्ये परतला आहे. मुलाच्या जन्मामुळे त्याने डिसेंबरमध्ये क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता आणि आता पुन्हा संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहली सर्वांचेच लक्ष वेधून घेईल, कारण याआधी रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील कसोटी मालिकेत भारतीय संघाला यश मिळवून दिलं होतं, अशीच अपेक्षा त्याच्याकडून असणार आहे.
विराट कोहली पुन्हा जबाबदारीसाठी सज्ज झाला आहे. त्याच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. कारण इंग्लंड संघ देखील मजबूत स्थितीत आहे. श्रीलंकेला २-० ने कसोटी मालिकेत क्लीन स्वीप देत ते आता भारत दौऱ्यावर येत आहेत. कर्णधार जो रूट चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याने दोन कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेमध्ये दुहेरी शतक झळकावत 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
विराट कोहली कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्धच्या महेंद्रसिंह धोणीच्या दोन मोठ्या विक्रमांना तोडण्याच्या अगदी जवळ आहे आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानणाऱ्या एक महान टीम त्याच्याकडे असल्यामुळे हे शक्य आहे. कसोटीत कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारतीय भूमीवर सलग 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि विराट कोहलीनेही भारतीय भूमीवर सलग 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि दोघेही बरोबरीत आहेत. विराटने आपल्या कर्णधारपदाखाली इंग्लंडविरुद्धची ही कसोटी मालिका जिंकल्यास, तो भारतामध्ये सलग 10 कसोटी मालिका जिंकणारा कर्णधार होईल आणि धोनीला मागे टाकेल.
त्याशिवाय एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकूण 21 कसोटी सामने जिंकले आहेत, तर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 20 कसोटी सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, जर त्याने इंग्लंडविरुद्ध दोन सामने जिंकले तर तो धोनीला मागे ठेवून कसोटी कर्णधार म्हणून भारतीय भूमीवर सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार बनेल. टीम इंडियाने अझरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने 13 कसोटी सामने जिंकले आणि ते तिसर्या क्रमांकावर आहे, तर सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने 10 कसोटी सामने जिंकले आणि तो चौथ्या क्रमांकावर आहे.