हैदराबादच्या घटनेनंतर विराट संतापला
हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरसोबत सामूहिक बलात्कार करुन तिची निघृणपणे हत्या करण्यात आली.
हैदराबाद : हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरसोबत सामूहिक बलात्कार करुन तिची निघृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. क्रिकेटपटूंनीही या घटनेची कठोर शब्दांमध्ये निषेध केला आहे. विराट कोहली, शिखर धवन, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी या प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे. तर हरभजन सिंग याने याप्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घालावं, असं आवाहन केलं आहे.
२७ नोव्हेंबरला ४ आरोपींनी पहिले पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि मदत करण्याचं नाटक केलं. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.
'हैदराबादमध्ये जे झालं ते लज्जास्पद आहे. समाज म्हणून आपण एक जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे. अशाप्रकारे अमानवीय कृत्य संपवा,' असं ट्विट विराटने केलं आहे.
'आपण अशा गोष्टी प्रत्येकवेळी होऊ देतो, आपल्यालाच लाज वाटली पाहिजे. वारंवार या गोष्टी होत आहेत, पण काहीच बदलत नाही. अशा अपराध्यांविरोधात आपण ठोस निती का बनवत नाही? पूर्ण शहरासमोर त्यांना फाशी का दिली जात नाही? नरेंद्र मोदी तुमचं लक्ष याकडे पाहिजे,' अशी प्रतिक्रिया हरभजनने दिली.
'दोषींना शिक्षा देण्याची ही वेळ आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभुती द्यायची गरज नाही. भारत सरकार आणि नरेंद्र मोदी यावर कठोर पावलं उचलतील, अशी अपेक्षा आहे,' असं लक्ष्मण म्हणाला आहे.
'हे खूप वेदनादायी आहे. ही घटना ऐकून मी हैराण झालो आहे. दोषींनी शिक्षा झाली पाहिजे. पीडित मुलीचं कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे,' असं वक्तव्य शिखर धवनने केलं आहे.
डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्यानंतर पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेऊन तिला हैदराबाद-बंगळुरू नॅशनल हायवेवर तिला जाळण्यात आलं. चारही आरोपींना २९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली आहे. चौघांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.