वेस्ट इंडिजविरूद्धच्या सिरीजमधून विराट कोहलीची अचानक एक्झिट!
विराट वेस्टइंडिज विरूद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये खेळणार नाहीये.
मुंबई : वेस्ट इंडिजविरूद्ध तिसरा टी-20 सामना उद्या होणार आहे. मात्र या सामन्यातून विराट कोहलीला वगळण्यात आलंय. विराट कोहलीसोबतच ऋषभ पंतला देखील तिसऱ्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या दोघांनाही बायो बबलमधून 10 दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. यामुळे विराट वेस्टइंडिज विरूद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये खेळणार नाहीये.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कोहली आणि विकेटकीपर पंत श्रीलंकेविरोधात सुरु होणाऱ्या तीन टी-20 सिरीजमध्येही खेळणार नाहीये. 24 फेब्रुवारीपासून लखनऊमध्ये ही सिरीज सुरु होणार आहे.
बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, कोहली आज सकाळीच घरी जाण्यासाठी रवाना झाला आहे. बोर्डाने असा निर्णय घेतला आहे की, सगळ्या फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेलाडूंना बायो बबलपासून नियमितरित्या ब्रेक देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाईल.
श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या दोन टेस्ट सामन्यांदरम्यान कोहली कमबॅक करण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 4-8 मार्च या काळात पहिली टेस्ट मोहालीमध्ये खेळवली जाईल. तर दुसरी टेस्ट मॅच 12-16 मार्च दरम्यान बंगळूरूमध्ये खेळवण्यात येईल.