भारतात राहण्यावरच्या वादानंतर विराट बॅकफूटवर
एका क्रिकेट चाहत्याला भारतात राहू नकोस असा सल्ला दिल्यानंतर विराट कोहलीवर टीकेची झोड उठली आहे.
मुंबई : एका क्रिकेट चाहत्याला भारतात राहू नकोस असा सल्ला दिल्यानंतर विराट कोहलीवर टीकेची झोड उठली आहे. यानंतर विराट बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. ट्रोलिंग करणं माझ्यासाठी नाहीये मित्रांनो.. मी स्वत: ट्रोल झाल्यामुळे संतुष्ट आहे. 'हे भारतीय' अशा पद्धतीनं सोशल नेटवर्किंगवर कमेंट करणाऱ्यांबद्दल मी बोललो होतो. मी व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. मित्रांनो सणांचा आनंद घ्या आणि मजा करा. सगळ्यांनी शांत राहा, असं ट्विट विराटनं केलं आहे.
विराट कोहलीला बॅट्समन म्हणून अवाजवी महत्त्व दिलं जातं. त्याच्या बॅटिंगमध्ये काहीच विशेष नाही. भारतीय खेळाडूंपेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची बॅटिंग बघणं मी जास्त पसंत करतो, असं सोशल नेटवर्किंगवर एक भारतीय म्हणाला.
विराट कोहलीनं या व्यक्तीची प्रतिक्रिया वाचली. ''माझ्यावर तुम्ही टीका केली तरी मला फरक पडत नाही. पण भारतात राहणाऱ्या एखाद्याला भारतीय खेळाडू आवडत नसतील तर त्यांनी भारतात राहू नये'', असं प्रत्युत्तर विराट कोहलीनं दिलं.
तुम्ही भारतात राहू नका, दुसरीकडे जाऊन राहा. तुम्ही आमच्या देशात राहून दुसऱ्या देशावर प्रेम का करता? असा सवाल विराटनं उपस्थित केला. माझ्यावर टीका केली तरी मला फरक पडत नाही.
दुसऱ्या देशावर प्रेम करायचं असेल तर या देशात राहू नका, असं मला वाटतं. तुम्हाला प्राधान्य ठरवता आलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली.