`...म्हणून आशिया कप स्पर्धेपूर्वी घेतला होता ब्रेक`, विराट कोहलीने केला मोठा खुलासा
विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असून संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Virat Kohli Take Break Before Asia Cup 2022 Say Reason: आशिया कप 2022 स्पर्धेला सुरुवात झाली असून क्रीडाप्रेमींच्या नजरा भारत पाकिस्तान सामन्याकडे लागून आहेत. असं असलं तरी या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीकडे लक्ष असणार आहे. विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असून संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. विराट कोहली धावा मिळवण्यासाठी धडपडत असल्याचं दिसत आहे.
2019 पासून त्याने एकही शतक झळकावलेलं नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीला वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे दौऱ्यात आराम दिला होता. मात्र आता या ब्रेकबाबत मोठा खुलासा केला आहे. विराट कोहलीने भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी सांगितलं की, "मी पहिल्या दिवसापासून माझ्या मनाचं ऐकतोय. संघाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीली जे पटलं ते मी करण्याचा प्रयत्न केला."
"मला असे वाटत होते की मी प्रशिक्षणासाठी उत्साही नाही. याचा मला खरोखर त्रास झाला. मी कधीच असा नव्हतो आणि खरोखरच त्या वातावरणापासून दूर गेलो आहे, याची जाणीव झाली. म्हणूनच मी ब्रेक घेतला. पण हा एक अद्भूत ब्रेक होता. एवढी मोठी विश्रांती मी यापूर्वी कधीच घेतली नव्हती. रोज सकाळी जिमला उत्साहात जायचो. व्यायाम ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तंदुरुस्त ठेवते. खेळाडूंनी तंदुरुस्त राहणे सर्वात महत्त्वाचे आहे.", असं विराट कोहलीने पुढे सांगितलं.
कोहली जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध 100 वा टी-20 सामना खेळणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना त्याच्याकडून आशिया कप स्पर्धेत धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असेल.