World Cup 2019: विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या नावावर `हा` लज्जास्पद विक्रम
न्यूझीलंडने टीम इंडियाचा १८ धावांनी पराभव करत भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आणले.
मँचेस्टर: कागदावर जगातील सर्वोत्तम बँटिंग लाईनअपचा लौकिक मिरवणाऱ्या टीम इंडियाच्या फलंदाजांनी न्यूझीलंडविरोधातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय क्रीडारसिकांची सपशेल निराशा केली. या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा १८ धावांनी पराभव करत भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आणले.
या सामन्यातील पराभवासाठी भारतीय संघातील आघाडीच्या फळीला आलेले अपयश मुख्य कारण ठरले. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी एक लज्जास्पद विक्रम केला आहे. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज रोहित शर्मा, के.एल. राहुल आणि विराट कोहली हे तिघेही जण अवघी एक-एक धाव करून तंबूत परतले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आघाडीचे तीन फलंदाज एक-एक धाव करून माघारी परतण्याची ही पहिलीच घटना आहे.
सर्वप्रथम रोहित शर्मा मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक टॉम लॅथमकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने चार चेंडूत अवघी एकच धाव केली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला विराट कोहली ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. या दोन धक्क्यांमधून भारत सावरायच्या आधीच मॅट हेन्रीचा चेंडू के.एल. राहुलच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. त्याने सात चेंडूंमध्ये अवघी एक धाव केली.
World Cup 2019 : सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का, न्यूझीलंड फायनलमध्ये
आतापर्यंत संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि के.एल.राहुल चांगल्या फॉर्ममध्ये होते. या तिघांनी अनुक्रमे ६४८, ४४३ आणि ३६१ धावा केल्या आहेत. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात हे तिघे स्वस्तात माघारी परतल्याने भारताला विश्वचषक स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.