मुंबई : आमिर खानसोबतच्या एका चॅट शो मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सहभागी झाला होता. यावेळी कोहलीने दिलखुलास गप्पा मारल्या. क्रिकेटबद्दलच्या आठवणीपासून ते आयुष्यातील गमतीदार किस्से याबद्दल तो मोकळेपणाने बोलला. या शो मध्ये त्याने २०११ च्या विश्वचषकातील आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात लसिथ मलिंगाच्या यॉर्करची भीती वाटत होती, अशी कबुली त्याने दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला क्रिकेटच्या क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. मात्र २०११ मध्ये विराट कोहलीला एक वेगळी अशी ओळख नव्हती. त्यावेळी  विश्वचषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात मलिंगाच्या गोलंदाजीची भीती वाटत होती, असे विराटने आमिरला सांगितले.


या अंतिम सामन्यात सलामीवीर सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली खेळायला आला होता. सामन्याबद्दल विराट म्हणाला की, "दोन गडी बाद झाल्यामुळे संघासोबत माझ्यावरही दडपण आले होते. मलिंगा यॉर्कर टाकेल, याची भीती होती. पण काही चेंडू खेळल्यानंतर मी मैदानात स्थिरावलो." 
या सामन्यात विराट कोहलीने गौतम गंभीरसोबत ८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. यात त्याने ३५ धावांचे योगदान होते. गौतम गंभीर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या दमदार खेळीमुळे श्रीलंकेला पराभूत करणे शक्य झाले आणि भारताला तब्बल २८ वर्षांनंतर दुसऱ्यांदा विश्वचषक पटकवण्याचा मान मिळाला.