टी-२० क्रमवारीत अफगाणिस्तानचा बॅट्समन भारतीय दिग्गजांच्यापुढे
आयसीसीने टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे.
दुबई : आयसीसीने टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या टी-२० सीरिजनंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे विराट टॉप-१० क्रमवारीच्या जवळ आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतली टी-२० सीरिज १-१ने बरोबरीत सुटली. आता दोन्ही टीममध्ये टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. या खेळीमुळे विराट १२व्या क्रमांकावरून ११व्या क्रमांकावर आला आहे. तर शिखर धवनने दोन मॅचमध्ये ४० आणि ३६ रन केले, त्यामुळे धवनला ३ क्रमांचा फायदा होऊन तो १३व्या क्रमांकावर आला आहे.
रोहित शर्मा आणि केएल राहुल टॉप-१०मध्ये आहेत. रोहित आठव्या आणि राहुल १०व्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा हजरतुल्लाह जजाई बॅटिंग क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानच्या कोणत्याही खेळाडूची ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. बॅटिंग क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आजम पहिल्या, ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या, कॉलिन मुन्रो तिसऱ्या आणि एरॉन फिंच चौथ्या क्रमांकावर आहे.
बॉलरच्या यादीत टॉप-१०मध्ये एकही भारतीयाचा समावेश नाही. कुलदीप यादव हा १४व्या क्रमांकावर आहे. तर टीम क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. टी-२० क्रिकेटमधला पाकिस्तानचा अव्वल क्रमांक कायम आहे. इंग्लंड दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर, ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड सहाव्या क्रमांकावर आहे. सातव्या क्रमांकावर असलेली अफगाणिस्तानची टीम क्रमवारीत श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या पुढे आहे.