दुबई : टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्स राखून पराभव स्वीकारावा लागला होता. विराट कोहली वगळता भारतीय संघाच्या एकाही फलंदाजाला या सामन्यात विशेष काही करता आली नाही. टीम इंडिया 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी भिडणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार विराट कोहली कोणतीही कसर सोडणार नाही. हा न्यूझीलंडविरुद्ध करो किंवा मरो असा सामना आहे. या महान सामन्यात टॉसची भूमिका महत्त्वाची असणार आहे.


टॉस ठरणार महत्त्वाचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर टीम इंडियाला हा सामना जिंकायचा असेल तर विराट कोहलीला टॉस जिंकावी लागेल. या T-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सुपर-12 चे 9 सामने खेळले गेले आहेत आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या टीमने 8 सामने जिंकले आहेत. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानने भारत आणि न्यूझीलंडचा पराभव केला. अफगाणिस्तान-स्कॉटलंड यांच्यातील सामना याला अपवाद म्हणता येईल.


विराट कोहली टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणं पसंत करेल. कारण दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मैदानावर दव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणं सोपं जातं. मात्र, टॉस जिंकण्याचा विराटचा विक्रम काही चांगला राहिलेला नाही.


टी20 वर्ल्ड कप: भारत 0, न्यूझीलंड 2 


टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने न्यूझीलंडविरुद्ध दोन सामने खेळले असून, हे दोन्ही सामने किवी संघाने जिंकले आहेत. 2007 मध्ये झालेल्या T-20 वर्ल्डकपच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही टीम आमनेसामने आल्या होत्या. ज्यावेळी न्यूझीलंडने भारताचा 10 धावांनी पराभव केला होता. यानंतर 2016 साली T-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड दुसऱ्यांदा आमनेसामने आले. नागपुरात झालेल्या त्या सामन्यात एमएस धोनीच्या संघाला 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.


18 वर्षांपासून विजयाची प्रतिक्षा


भारत-न्यूझीलंड संघ मर्यादित ओव्हर्सच्या वर्ल्डकपमध्ये एकूण 11 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत, त्यापैकी न्यूझीलंडने 7 सामने आणि टीम इंडियाने केवळ 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचवेळी एक सामना रद्द करण्यात आला. 2003च्या वर्ल्डकपनंतर मर्यादित ओव्हर्सच्या विश्वचषकात भारताला न्यूझीलंडचा पराभव करता आलेला नाही.