कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदाच विराट कोहलीची पोस्ट, म्हणाला...
आता कर्णधारपदावरून हटल्यानंतर विराटची पोस्ट व्हायरल होतेय.
मुंबई : भारतीय कसोटी टीमचा कर्णधार विराट कोहलीची बीसीसीआयने नुकतीच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी केली. या दिग्गज खेळाडूने यापूर्वीच टी-20चं कर्णधारपद सोडलं आहे. विराटला कर्णधारपदावरून हटवल्याने बीसीसीआयवर टीका होतेय. विराटचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. मात्र तो आतापर्यंत आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला आहे. दरम्यान आता कर्णधारपदावरून हटल्यानंतर विराटचं मोठं वक्तव्य आलं आहे.
कर्णधारपदावरून हटल्यानंतर विराटने पहिल्यांदा मोठं वक्तव्य केलं आहे. खरंतर विराटने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. काल म्हणजेच 11 नोव्हेंबरला त्यांनी ही पोस्ट टाकली. आजच्या दिवशी विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये विराटने लिहिलं की, 'माझी मस्करी आणि माझा आळस सांभाळण्याची 4 वर्षे. 4 वर्ष मला स्विकारण्याची आणि माझ्यावर प्रेम करण्याची, मी कितीही नाराज झालो तरी. देवाच्या सर्वात मोठ्या आशीर्वादाची 4 वर्षे. सर्वात प्रामाणिक, प्रेमळ, धाडसी स्त्रीशी लग्न झाल्याची 4 वर्षे आणि जिने मला योग्य ते करण्यासाठी उभं राहण्याची प्रेरणा दिली, जरी संपूर्ण जग तुमच्या विरोधात असेल. लग्नाला 4 वर्ष झाली. तू मला प्रत्येक प्रकारे पूर्ण करते, माझ्याकडे जे काही आहे त्यावर मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करीन आणि बरेच काही.'
अनुष्कानेही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट देखील केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनुष्काने लिहिले की, "कोणताही मार्ग सोपा नसतो. घरासाठी कोणतेही शॉर्टकट नाही. तुमची आवडती गाणी आणि शब्द जे तुम्ही कायम जगता. हे शब्द नातेसंबंधांसाठी योग्य आहेत. तुमच्यासारख्या व्यक्तीला धारणांनी भरलेल्या जगात हे करण्यासाठी धैर्य लागते. मला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद आणि जेव्हा तुम्हाला ऐकण्याची गरज असेल तेव्हा तुमचे मन मोकळे ठेवल्याबद्दल धन्यवाद."
विराटचे कोच बीसीसीआयवर भडकले
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत, तर विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्माही याबाबत थोडे नाराज झालेत. कोहलीने स्वतःच्या इच्छेने टी-२० चे कर्णधारपद सोडलं होतं, असं त्यांचं मत आहे. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांनी त्याला स्पष्टपणे सांगायला हवं होतं की, कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा त्याला कोणत्याही फॉरमॅटमधून हटवायचं नाही.