विराटचं असं वागणं बालिशपणाचं; माजी खेळाडूचे कोहलीवर ताशेरे
डीआरएस वादामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला.
दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये शेवटचा कसोटी सामना सुरू आहे. दरम्यान सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचं वातावरण काही प्रमाणात तापलं होतं. डीआरएस वादामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. यावरून त्याने अंपायरशी वाद घातला. तर आता, कोहलीच्या या वृत्तीवर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे.
कोहलीच्या कृत्यावर संतापला गंभीर
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, "कोहलीचं हे वागणं खूप बालिशपणाचं आहे. स्टंपच्या माईकवर असं बोलणं कोणत्याही भारतीय कर्णधारासाठी सर्वात वाईट आहे."
असं केल्याने तुम्ही तरुणांसाठी कधीही आदर्श बनू शकणार नाही, असंही गंभीर म्हणाला. दरम्यान गौतम गंभीरच्या या विधानात तथ्यही आहे.
तर दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज शॉन पोलॉक म्हटला की, भारताला विकेट घ्यायच्या होत्या, त्यामुळे त्यांच्या भावना बाहेर आल्या. हॉक-आय अशी गोष्ट आहे ज्यावर तुम्ही निर्णय घेण्यासाठी अवलंबून आहात. भारतीय संघाची निराशा मी समजू शकतो, कारण त्यांना विकेट काढायच्या होत्या.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तिसऱ्या दिवशी 21व्या ओव्हरमध्ये रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करत होता. या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर अश्विनने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरला एलबीडब्ल्यू आऊट केलं. मैदानात असलेल्या अंपायरने भारताच्या बाजूने निर्णय दिला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने लगेच डीआरएस रिव्ह्यू घेतला. यानंतर, रिप्लेमध्ये बॉल विकेटच्या लाईनवर त्याच्या गुडघ्याच्या खाली लागत असल्याचं दिसतं.
सहसा अशा परिस्थितीत फलंदाजाला नॉटआऊट दिलं जात नाही. परंतु बॉल ट्रॅकिंगनुसार, बॉल स्टंपच्या वरून जात होता. त्यामुळे थर्ड अंपायरने डीन एल्गरला नॉटआऊट दिलं.
यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली स्टंपच्या मायक्रोफोनमध्ये म्हणाला, 'फक्त विरोधी टीमवरच नाही तर तुमच्या टीमवरही लक्ष केंद्रित करा. संपूर्ण देश 11 खेळाडूंविरुद्ध एकत्र खेळतेय.