म्हणून सेहवाग ९३ वर्षांच्या आजोबांच्या पाया पडला
क्रिकेट खेळत असताना धडाकेबाज बॅटिंगमुळे चर्चेत असलेला सेहवाग आता त्याच्या धमाकेदार ट्विट्समुळे चर्चेत असतो.
मोहाली : क्रिकेट खेळत असताना धडाकेबाज बॅटिंगमुळे चर्चेत असलेला सेहवाग आता त्याच्या धमाकेदार ट्विट्समुळे चर्चेत असतो. यावेळी मात्र सेहवागनं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. सेहवाग हा आयपीएलमध्ये पंजाबच्या टीमचा सल्लागार आहे. पंजाबच्या मॅचवेळी सेहवाग मोहालीच्या मैदानात उपस्थित होता. ही गोष्ट सेहवागच्या एका वृद्ध इसमाला कळली. त्यामुळे ते थेट पटियालावरून चंडीगडला सेहवागला भेटायला आले.
सेहवागला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तो या ९३ वर्षांच्या आजोबांना भेटायला गेला. या भेटीवेळी आजोबांनी सेहवागच्या जुन्या खेळींबद्दल आठवणी सांगितल्या. सेहवागनंही आजोबांची विचारपूस केली. या आजोबांना पाहून सेहवाग भावूक झाला आणि मैदानातच त्यानं आजोबांचे पाय धरले.
सेहवागनं आजोबांबरोबर फोटो काढून तो इन्स्टाग्रामवर शेअर केला. ओमप्रकाशजींना भेटून मी भावूक झालो. ९३ वर्षांचे आजोबा मला भेटायला पटियालाहून चंडीगडला आले. आजोबांना माझा प्रणाम, असं सेहवाग म्हणाला आहे.