Virender Sehwag : भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मैदानाच्या आत तसेच बाहेरही प्रतिस्पर्ध्यांना नेहमीच घाम फोडत असतो. निवृत्तीनंतरही सेहवाग आक्रमकपणे आपल्या विरोधकांना प्रत्युत्तर देत असतो. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैदानावर पाकिस्तानी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेणाऱ्या सेहवागने आता अतिउत्साही पाकिस्तानी टीव्ही अँकरला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.


झैद हमीद नावाचा पाकिस्तानी टीव्ही अँकर क्रिकेटपटू आशिष नेहराला (Ashish Nehra) नीरज चोप्रा (Neeraj chopra) समजून बसला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने  (Arshad Nadeem) कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) 90.18 मीटरच्या विक्रमासह देशाला पहिले भालाफेक सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर अर्शद नदीमचे अभिनंदन करताना झैद हमीदने नीरज चोप्राऐवजी आशिष नेहराच्या नावाचा उल्लेख केला. या प्रकरणावरून सेहवागने पाकिस्तानी टीव्ही अँकरची फिरकी घेतली आहे.


पाकिस्तानच्या अर्शद नदीमचे झैद हमीदला अभिनंदन करायचे होते. या अभिनंदनाच्या माध्यमातून त्याला नदीमची तुलना नीरज चोप्रासोबत करायची होती. पण यादरम्यान त्याच्याकडून चूक झाली. त्याने माजी क्रिकेटपटू आशिष नेहरालाचा उल्लेख नीरज चोप्रा म्हणून केला. 


"या विजयाला आणखीनच आनंद देणारी गोष्ट म्हणजे या पाकिस्तानी खेळाडूने भारतीय भालाफेकपटू आशिष नेहराचा पराभव केला आहे. गेल्या सामन्यात आशिषने अर्शद नदीमचा पराभव केला होता," असे हमीदने ट्विट करत म्हटले होते.


यानंतर ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या सेहवागने झैद हमीदला ट्रोल करत एक ट्विट केले आहे. 'चिचा, आशिष नेहरा सध्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीची तयारी करत आहे. तोपर्यंत मजा करा,' असा उपरोधिक टोला सेहवागने लगावला आहे.



दरम्यान अनेकांना आशिष नेहराचा चेहरा ऋषी सुनक यांच्यासारखा वाटतो. बोरिस जॉन्सन सरकारमध्ये मंत्री असलेले सुनक सध्या ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे सेहवागने असा खोचक टोला लगावला.