हैदराबाद : क्रिकेटच्या मैदानात नेहमीच शांत असलेला व्हीव्हीएस लक्ष्मण चांगलाच संतापला आहे. लक्ष्मण बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आणि आयपीएलमध्ये हैदराबादच्या टीमचा मेंटर आहे. परस्पर हितसंबंधांच्या आरोपांवरून लक्ष्मणने बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांना उत्तर दिलं आहे. लोकपाल डी.के.जैन यांच्याकडे लक्ष्मणच्या परस्पर हितसंबंधांची तक्रार करण्यात आल्यानंतर, जैन यांनी लक्ष्मण याच्याकडे उत्तर मागितलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी मी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा पदभार स्वीकारला होता. कोणत्याही प्रकारच्या परस्पर हितसंबंधांमध्ये मला सामील व्हायचं नव्हतं,' असं लक्ष्मण डी.के.जैन यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाला. लक्ष्मण याच्या वकिलांनी लोकपाल यांना हे पत्र लिहिलं आहे. निवृत्तीनंतर मला भारतीय क्रिकेटची सेवा करायची होती. पण माझ्या हेतूविषयी शंका उपस्थित होत असतील, तर मला अशा स्थितीमध्ये पडायचं नाही, असं या पत्रात लक्ष्मणने लिहिलं आहे.


'माझ्या अनुभवातून भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मी क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सामील झालो होतो. निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटला सुपर पॉवर बनवण्यासाठी या प्रस्तावाने मला प्रेरित केलं. जे आरोप लावण्यात आले आहेत ते निराधार आहेत, कारण आम्ही कोणत्याही खेळाडू किंवा प्रशिक्षकाची निवड करत नाही. तसंच क्रिकेट सल्लागार समिती ही स्थायी समिती नाही,' अशी प्रतिक्रिया लक्ष्मणने दिली आहे.


प्रशासकीय समितीवरही टीका


लक्ष्मणने सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयमध्ये नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीवरही टीका केली आहे. प्रशासकीय समितीसोबत ताळमेळ नसल्याचं लक्ष्मण या पत्रात म्हणाला आहे. क्रिकेट सल्लागार समिती कशी काम करेल याबद्दल प्रशासकीय समितीने आम्हाला काहीही स्पष्ट सांगितलं नाही. ७ डिसेंबर २०१८ रोजी आम्ही प्रशासकीय समितीला पत्र लिहिलं आणि आमची जबाबदारी नेमकी काय आहे? याबाबत स्पष्टीकरण मागितलं. याबद्दल अजूनही उत्तर मिळालं नसल्याचा दावा लक्ष्मणने केला आहे.


२०१५ सालच्या आदेशानुसार क्रिकेट सल्लागार समितीच्या कार्यकाळावर कोणतंही भाष्य करण्यात आलं नव्हतं. क्रिकेट सल्लागार समिती अस्तित्वात आहे का नाही, यावर चर्चा झाली पाहिजे, असं मत लक्ष्मणने मांडलं आहे.


'ज्या जबाबदाऱ्यांची आम्ही अपेक्षा करत होतो, तशा प्रकारचं काम आम्हा तिघांनाही देण्यात आलं नाही. आम्ही कोणत्याहीप्रकारे निवड समिती नव्हतो. क्रिकेट सल्लागार समिती अस्तित्वात आहे का नाही हे मला माहिती नाही, त्यामुळे परस्पर हितसंबंधांचा मुद्दा यामध्ये येत नाही', असं लक्ष्मणला वाटत आहे. 


बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी त्यांच्या कार्यकाळात २०१५ साली क्रिकेट सल्लागार समितीचं गठन केलं. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश करण्यात आला.