``काका-काकी म्हणायचे, `काळी पडशील, कोणीच लग्न नाही करणार`!``
त्या काळात हैदराबादमध्ये एखाद्या मुलीने टेनिस खेळायला सुरूवात करने ही असामान्य गोष्ट होती.
मुंबई: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे नाव जगभरात किती प्रसिद्ध आहे आपण जाणताच. देशभरातील चाहते तिच्या खेळावर फिदा असतात. आज जरी सानिया एक यशस्वी खेळाडू म्हणून ओळखली जात असली तरी, तिचा सुरूवातीचा काळ तितका सोपा नव्हता. सानियाने आपल्या टेनिस कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळाबाबतच्या काही आठवणी नुकत्याच सांगितल्या. सुरूवातीच्या काळात लोक तिची कशी खिल्ली उडवायचे हे सांगतानाच सानियाने आपल्या काका-काकीबद्दलची एक आठवणनही सांगितली आहे. सानिया सांगते, मी टेनिस खेळायला जाते हे जेव्हा माझ्या काका काकींना समजले तेव्हा ते म्हणाले, 'तू काळी पडशील, मग तुझ्याशी लग्न करायला कोणीच तयार होणार नाही'.
सहा वेळा जिंकले ग्रँड स्लॅम
सहा वेळा ग्रँड स्लॅम किताब जिंकणारी सानिया सांगते, 'मी सहा वर्षापासून टेनिस खेळायला सुरूवात केली. त्या काळात हैदराबादमध्ये एखाद्या मुलीने टेनिस खेळायला सुरूवात करने ही असामान्य गोष्ट होती. मी क्रिकेटपटूच्या घरातून आली आहे. माझे वडीलही चांगले क्रिकेटपटू होते.' संयुक्त राष्ट्रने 'मुझे हक हैं' महिला गीत नुकतेच लाँच केले. या गातीच्या लॉंचिंगवेळी सानियाने या आठवणी सांगितल्या.
वडील माझ्यासाठी सर्वात मोठे हिरो
सानियाने सांगितले की, 'माझे वडील माझ्यासाठी सर्वात मोठे हिरो आहेत. त्यांना माझ्याही पेक्षा मोठा संघर्ष करावा लागला. लोक माझ्या वडीलांची खिल्ली उडवत आणि उपहासाने विचारायचे तुम्हाला काय वाटते, तुमची मुलगी मार्टिना हिंगीस बनेल? विशेष म्हणजे नशीब बघा, मी पुढे जाऊन मार्टिना हिंगस सोबत तीन ग्रॅंड स्लॅम जिंकले.'