मुंबई : आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाब टीमची मालकीण प्रिती झिंटा आणि मेंटर वीरेंद्र सेहवाग यांच्यामध्ये भांडण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण या बातम्या निराधार आणि कपोल कल्पित असल्याचं पंजाब टीमकडून सांगण्यात येतंय. या सगळ्या बातम्यांचं पंजाबच्या टीमनं खंडन केलं आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर टीमच्या कामगिरीची समीक्षा होते. ही समीक्षा औपचारिक आणि अनौपचारिक असते. यामुळे कामगिरी सुधारायला मदत होते, असं टीमकडून सांगण्यात आलंय. टीमचा प्रत्येक जण स्पष्टपणे बोलतो हीच पंजाबच्या टीमची संस्कृती आहे. कामगिरी प्रत्येकवेळी सुधारावी हाच यामागचा उद्देश आहे, असं स्पष्टीकरण पंजाबच्या टीमनं दिलं आहे.


'त्या बातम्या खोट्या'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आमच्या मधल्या वादाच्या बातम्या खोट्या असल्याचं प्रिती झिंटानं स्पष्ट केलं आहे. ट्विटरवर हॅशटॅग फेक न्यूज असं कॅप्शन देऊन प्रिती झिंटानं याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार मंगळवारी राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर चिडलेल्या प्रीतीने सेहवागला खरे खोटे सुनावले. ज्यानंतर सेहवाग या संघासोबत न राहण्याचा विचार करतोय. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंजाबला विजयासाठी १५८ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यातही पंजाबला अपयश आले. मिळालेल्या वृत्तानुसार पराभवानंतर प्रीती संघाच्या डगआउटमध्ये गेली आणि खेळाडूंसमोर सेहवागला पराभवासाठी जबाबदार ठरवत त्याच्या रणनीतीवर सवाल उपस्थित केले.