वसीम अकरमने सांगितल्या शमी आणि बुमराहच्या चुका, भुवीला म्हणाला बेस्ट!
वसीम अकरमने दिला भारतीय गोलंदाजांना सल्ला...
सेंट मौरित्ज : भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीने प्रभावित झालेला पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अकरम म्हणाला की, मोहम्मद शमीने जर रनअपमध्ये दुरुस्ती केली आणि जसप्रीत बुमराहने काही वेळ काउंटी क्रिकेट खेळल्यास तो इंग्लंड दौ-यावर उत्तम कामगिरी करू शकतो.
शमीला दिला अकरमने सल्ला
जगातला सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाजांच्या यादीतील अकरमला वाटतं की, सध्याचे भारतीय वेगवान गोलंदाज आक्रामक आत्मविश्वासाने भरलेले आहेत. तो म्हणाला की, ‘शमी चांगला गोलंदाज आहे, पण अनेकदा मला वाटतं की तो सुस्त आहे. वेगवान गोलंदाज असण्याच्या नात्याने त्याने स्फुर्तीने फलंदाजाला चूक करण्यासाठी मजबूर करत राहिलं पाहिजे. रनअपवेळी शमी अनेकदा क्रीजवर येण्याआधी लहान रनअप घेतो. अनेकदा लय भरकटल्यानेही रनअप कमी होतो आणि बॉल सरळ फेकला जात नाही. यामुळे गोलंदाजाचा वेगही कमी होतो’.
शमीला या गोष्टीचा त्रास
शमीच्या टोंगळ्याच्या जखमीवरही अकरम म्हणाला की, ‘शमीला ही अडचण आहे. शोएब अख्तर यालाही टोंगळ्याचा त्रास होता. त्याला शरीराच्या खालच्या भागातील मांसपेशींवर काम करावं लागेल’.
बुमराहला दिला सल्ला
अकरम म्हणाला की, ‘बुमराह जर कमीत कमी एक महिना काउंटी क्रिकेट खेळता तर तो आणखी चांगला गोलंदाज होऊ शकतो. भारतीय बोर्डाने बुमराहला सांगावं की, आयपीएल खेळण्यापेक्षा एक महिना काउंटी क्रिकेट खेळ’.
भुवनेश्वर कुमारचं कौतुक
तसेच अकरम म्हणाला की, ‘सध्या भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार सर्वश्रेष्ठ आहे. मला भुवनेश्वर कुमार हा साऊथ आफ्रिकेत सर्वात प्रभावी वेगवान गोलंदाज वाटला. तो दोन्ही बाजूने बॉल स्विंग करू शकत होता. आता आणखी वेगासोबत तो अधिकच प्रभावी झाला आहे’.