नवी दिल्ली :  बांग्लादेश विरूद्ध फलंदाजी करताना रोहित शर्माने एक नवा विक्रम केला तर दुसरीकडे गोलंदाजीत युवा स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने कमाल केली. बांग्लादेश विरूद्ध भारताने १७७ धावांचे लक्ष्य ठेवले तेव्हा मागील सामन्याची कामगिरी पाहता हे सहज लक्ष्य वाटत होते. पण वॉशिंग्टन सुंदर याची शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांग्लादेशाला सुरूवातीला धक्के लाले आणि त्यांनी गुडघे टेकले. त्याने पहिल्या तीन खेळाडूंना झटपट बाद केले. 


वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या स्पेलमध्ये ३ ओव्हरमध्ये केवळ १८ धावा देत ३ विकेट पटकावल्या. आता वॉशिंग्टन सुंदर टी-२० मध्ये ३ विकेट घेणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम अक्षर पटेलच्या नावावर होता. पटेलने २०१५ मध्ये झिम्बाब्वेच्या विरूद्ध खेळताना २१ वर्ष आणि १७८ दिवसांचा असताना १७ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या. तर वॉशिंग्टन सुंदर याने १८ वर्ष आणि १६० दिवस वय असताना टी-२० क्रिकेटमध्ये ३ विकेट पटकावल्या आहेत.