लीड्स : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला. २०१९ साली होणारा वर्ल्ड कप इंग्लंडमध्येच होणार आहे. त्यामुळे ही सीरिज म्हणजे वर्ल्ड कप पूर्वीची भारताची परीक्षा आहे, असं म्हणलं जात होतं. पण या सीरिजमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमची डोकेदुखी वाढली आहे. यानंतर २०१९ च्या वर्ल्ड कपबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीनं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. वर्ल्ड कपसाठी फक्त एका खेळाडूवर अवलंबून राहता येणार नाही, असं कोहली म्हणाला आहे. वर्ल्ड कप ही मोठी स्पर्धा आहे. वर्ल्ड कपमध्ये तगड्या टीम एकमेकांविरुद्ध खेळतात त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये सांघिक कामगिरी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली आहे.


वर्ल्ड कपआधी अजून १५-१६ मॅच बाकी आहेत. या मॅचमध्ये आम्हाला आमचा खेळ सुधारावा लागेल. तसंच टीमसाठी योग्य संतुलन शोधावं लागले. या सीरिजमध्ये बॅट्समननी योग्य कामगिरी केली नाही. या पराभवामुळे आम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करायची आहे हे कळेल, असं कोहली म्हणाला.