World Cup Final: टॉस जिंकल्यावर बॅटिंग करणार की बॉलिंग? रोहित स्पष्टच म्हणाला, `मला वाटतं की टॉस..`
Toss India vs Australia 2023 World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या मैदानामध्ये 4 सामने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आलेत.
Toss India vs Australia 2023 World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना होणार आहे. या सामन्याचा टॉसही फार महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या 5 वर्ल्ड कपमध्ये टॉस जिंकणाऱ्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करुन मोठा स्कोअर केला आणि वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे आजही टॉस जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी घेणार का याची चर्चा आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी घेण्याच्या बाजूने असलेल्यांना धक्का देणारी आकडेवारी असं सांगते की मागील 3 एकदिवसीय वर्ल्ड कप हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. टी-20 वर्ल्ड कपची आकडेवारी पाहिली तरी मागील 4 वर्ल्ड कप धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकला आहे. त्यामुळे आज टॉस जिंकल्यास रोहित शर्माने गोलंदाजी घ्यावी की फलंदाजी हा प्रश्नच आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार गोंधळात
शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स हा टॉसबद्दल गोंधळलेला दिसला. "मला वाटतं की उजेडामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करुन घ्यावी कारण नंतर लाईटच्या प्रकाशात फलंदाजी कठीण जाते. मात्र दुसऱ्या इनगिंगमध्ये नंतर दवामुळे चेंडू निसटेल अशीची भिती आहे," असं कमिन्स म्हणाला.
केवळ एकच संघ पहिल्यांदा बॅटिंग करुन जिंकला
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचे एकूण 4 सामने झाले आहेत. यापैकी 3 सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. यामध्ये भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केलेल्या सामन्याचाही समावेश आहे. या मैदानामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करुन सामना जिंकणारा एकमेव संघ हा ऑस्ट्रेलियाचाच आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला या मैदानामध्ये पराभूत केलं आहे. 287 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 253 वर बाद झाला.
रोहित टॉसबद्दल काय म्हणाला?
मात्र हे सामने जवळपास महिन्याभरापूर्वी झाले होते. आता भारतामधील तापमान हिवाळ्यात कमी झालं असून तापामनाचा परिणाम होणार असं भारतीय कर्णधार रोहित शर्माही पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला. "तापमान नक्कीच आधीपेक्षा कमी झालं आहे. दवाचा किती परिणाम होईल मला ठाऊक नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी आम्ही दवं असेल असा विचार करुन सराव केला होता. मात्र फारसं दवं मैदानामध्ये नव्हतं," असं रोहितने सांगितलं. "वानखेडेवरही असाच सराव केला. पण तिथेही दवं नव्हतं. त्यामुळेच मला वाटतंय की टॉस हा महत्त्वाचा घटक या (अंतिम) सामन्यात नसेल," असंही रोहित म्हणाला.