फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे स्वतःशीच काय म्हणत होता?
अजिंक्य रहाणे जेव्हा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हापासून तो काहीतरी बोलत होता
मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जातोय. यामध्ये भारताची प्रथम फलंदाजी असून मॅचवर चांगली पकड दिसून येतेय. या सामन्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला स्थान देण्यात आलेलं आहे. उपकर्णधारपद काढून घेतल्यानंतर रहाणे संधीचं सोनं करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अजिंक्य रहाणे 40 धावांवर नाबाद खेळत होता. त्यात त्याने 8 चौकार मारले आहेत. विशेष म्हणजे अजिंक्य रहाणे जेव्हा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हापासून तो काहीतरी बोलत होता आणि आपले लक्ष एकाग्र करण्याचा प्रयत्न करत होता.
फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे वारंवार 'वॉच द बॉल, वॉच द बॉल' असं स्वतःला म्हणत होता. असं म्हणत तो बॉलवर लक्ष केंद्रित करत होता. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर बॉल वेगाने येतो आणि स्विंग होतो, त्यामुळे या मैदानावर फलंदाजी करणं काही प्रमाणात कठीण आहे.
गेल्या काही सामन्यांपासून अजिंक्य रहाणेची बॅट फारशी चालली नाही. त्याचा फॉर्ममुळे त्याचं उपकर्णधारपदंही काढून घेण्यात आलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी देण्यात आली असून यामध्ये त्याची कारकिर्द पणाला लागली आहे.
अजिंक्य रहाणे गेल्या काही दिवसांपासून टीममध्ये पुन्हा आपलं स्थान पक्क करण्यासाठी झगडतोय. सामन्यादरम्यान रहाणेचा मंत्र कामाला आला आणि त्याने पहिल्या दिवशी उत्तम शॉट्स खेळले. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे मोठी खेळी करणार का याकडेच चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.