VIDEO : सचिनसाठी देशभक्ती म्हणजे....
राष्ट्रगीताचा उल्लेख होतो तेव्हा....
नवी दिल्ली : क्रिकेट या खेळाला पूजनीय समजल्या जाणाऱ्या आपल्या भारत देशात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. क्रीडाजगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या या खेळाडूने नुकतच आपल्या देशाविषयी आणि राष्ट्रगीताविषयी अत्यंत महत्त्वाचं असं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रगीताचा उल्लेख होतो तिथे इतर सर्व गोष्टी आपोआप मागे जातात, असं त्याने स्पष्ट केलं.
गुरुवारी भारतीय संविधानात राष्ट्रगीताला समाविष्ट करुन ६९ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचवेळी मास्टर ब्लास्टर बोलत होता.
राष्ट्रगीताविषयी आपल्या भावना व्यक्त करत त्याने यावेळी २००३ विश्वचषकामधील काही आठवणी जागवल्या. २००३ मध्ये पाकिस्तानच्या संघाविरोधात खेळत असताना ६० हजार क्रीडारसिकांच्या समोर मैदानाच्या मध्यभागी उभं राहून राष्ट्रगीत म्हणताना प्रचंड अभिमान वाटत असल्याचं त्याने सांगितलं.
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याने याविषयी लिहिलं. 'प्रत्येक वेळी राष्ट्रगीत जेव्हा सादर करण्यात आलं तेव्हा कलाकार, श्रेष्ठ वादक, सैन्यदलातील जवान हे सर्वजण एकत्र आले. प्रत्येक वेळी राष्ट्रगीताचं फार प्रभावी आणि अभिमानास्पद सादरीकरण करण्यात आलं. यामध्ये कधी तुमच्या अंगावर काटा उभा राहिला नाही, असं झालंच नाही', असंही तो म्हणाला. देश आणि राष्ट्रगीताप्रती आदराची आणि प्रचंड अभिमानाची भावना व्यक्त करणाऱ्या सचिनच्या या वक्तव्याने सर्वांचीच मनं जिंकली.