U19 World Cup : भूवीपेक्षा घातक `इनस्विंगर`, कांगारूंच्या दांड्या मोडणारा Raj Limbani आहे तरी कोण?
Raj limbani Under 19 cricket team : पाकिस्तान सीमेजवळील वाळवंटातील वाळूवर टेनिस बॉलने गोलंदाजी करण्यापासून वर्ल्ड कप फायनलमध्ये कांगारूंच्या विकेट्स मोडण्यापर्यंतचा प्रवास राज लिंबानी याचा राहिला आहे.
U19 World Cup Final 2024 : अंडर-19 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बेनोनी येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कॅप्टनचा निर्णय योग्य ठरवला. भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज राज लिंबानी (Raj limbani) याने ऑस्ट्रेलियाला घाम फोडला होता. राज लिंबानीने अशा काही घातक इनस्विंग केलेत की, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बॉल देखील दिसत नव्हता. लिंबानीच्या गोलंदाजीला ऑस्ट्रेलियन सलामीवीर सॅम कॉन्स्टासकडे उत्तर नव्हतं.
राज लिंबानी याने फायनल सामन्यात उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. राज लिंबानीने 10 ओव्हरमध्ये 38 धावा देत 3 विकेट्स नावावर केल्या. सलामीवीर सॅम कॉन्स्टास, रायन हिक्स आणि चार्ली अँडरसन यांना परतीचा रस्ता दाखवला. राज लिंबानी आणि नमन तिवारी यांच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाला 253 धावांवर रोखता आलं. राज लिंबानी याच्या फायनलमधील कामगिरीमुळे त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होतोय. राजने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये नेपाळविरुद्ध 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला होता.
राज लिंबानी आहे तरी कोण?
पाकिस्तान सीमेजवळील वाळवंटातील वाळूवर टेनिस बॉलने गोलंदाजी करण्यापासून वर्ल्ड कप फायनलमध्ये कांगारूंच्या विकेट्स मोडण्यापर्यंतचा प्रवास राज लिंबानी याचा राहिला आहे. राज लिंबानी याच्याकडे दोनच पर्याय होते, एकतर आपल्या इतर भावंडांप्रमाणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं किंवा वडिलांना शेतीत मदत करावी. मात्र, राजने आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला. कच्छच्या रणमधील दयापर या गावापासून 550 किमी दूर बडोद्यात गेला अन् क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. तिथून तो प्रथम श्रेणी क्रिकेट बडोद्यासाठी, नंतर भारत अ आणि आता अंडर-19 वर्ल्ड कपचा प्रवास त्याने केलाय. वर्ल्ड कपपूर्वी इरफान पठाण संघासोबत एनसीएमध्ये होता आणि त्याने त्यांच्यासोबत चांगले 10 किंवा 12 दिवस घालवले होते.
भारत अंडर-19 :- आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्या पांडे.
ऑस्ट्रेलिया अंडर-19 :- ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर.