मुंबई : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी शुक्रवारी मुंबईत मुलाखती सुरु आहेत. बीसीसीआयच्या कार्यालयात सकाळी 10 वाजता मुलाखती सुरु झाल्या. कपिल देव यांच्या नेतृत्वात क्रिकेट सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या समितीत अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपदासाठी 6 नावांची यादी बनवली आहे. ज्यापैकी एकाची निवड करण्यात येणार आहे. ज्यामध्ये रवी शास्त्री, माजी क्रिकेटर लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंह यांचं देखील नाव आहे.


कोण आहे स्पर्धेत


- रवी शास्त्री (वय 57 वर्षे; 80 टेस्ट, 150 वनडे )


- टॉम मुडी (वय 53; 8 टेस्ट, 76 वनडे )


- माइक हेसन (वय 44; खेळाडू म्हणून अनुभव नाही)


- फिल सिमंस (वय 56; 26 टेस्ट, 143 वनडे)


- लालचंद राजपूत (वय 57; 2 टेस्ट, 4 वनडे )


- रॉबिन सिंह (वय 55; 1 टेस्ट, 136 वनडे)



मुलाखतीसाठी लालचंद राजपूत, रॉबिन सिंह आणि माइक हेसन व्यक्तिगतरित्या उपस्थित राहणार आहेत. तर रवी शास्त्री यांच्यासह आणखी 2 जण स्काईप (SKYPE) च्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. कोचच्या शर्यतीत रवी शास्त्री सध्या पुढे आहेत.


जुलै 2017 मध्ये रवी शास्त्री दुसऱ्यांदा कोच बनले होते. त्यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 21 टेस्ट सामने खेळले ज्यामध्ये 13 सामने भारताने जिंकले. 36 पैकी 25 टी-20 आणि 60 पैकी 43 वनडे सामने भारताने जिंकले आहेत. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारताने एकूण 81 सामने जिंकले.


क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये जुलै 2017 नंतर भारताच्या विजयाचं प्रमाण पाहिलं तर, टेस्टमध्ये 52.38 टक्के, टी-20 मध्ये 69.44 टक्के आणि वनडेमध्ये 71.67 टक्के राहिलं आहे. रवी शास्त्री यांच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 2015 नंतर 2019 मध्ये ही भारत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पराभूत झाला.


बीसीसीआयकडून आज संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेतली जाणार असून भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकांची घोषणा केली जाणार आहे.