भारतात सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात भारताने आपल्या सहाव्या विजयाची नोंद केली. लखनौच्या अवघड आणि फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकली. भारतीय बॉलर्सने पहिल्या 10 ओव्हर्समध्येच इंग्लंडच्या 4 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. जसप्रीत बुमराहने 2 चेंडूत 2 विकेट्स घेत इंग्लंडला धक्का दिला. मोहम्मद शमीने दोन ओव्हरनंतर पुन्हा याचीच पुनरावृत्ती करत इंग्लंडल बॅकफूटवर ढकलले. इंग्लंडचे विश्वासू फलंदाज बेन स्टोक्स आणि जो रूट हे दोघेही शून्यावर बाद झाले. तर डेविड मलानला केवळ 16 धावा करता आल्या. त्याचप्रमाणे जॉनी बेअरस्टोने 14 धावा करुन पव्हेलियनचा रस्ता पकडला. इंग्लंडच्या इतर कोणत्याही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जॉस बटलर आणि मोईन अली हे दोघे डाव सावरत आहेत असं वाटत असतानाच भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने बटलरला एका भन्नाट बॉलवर बाद केलं. बटलर बाद होताच इंग्लंडच्या जिंकण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्या. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर कुलदीप त्यांच्या गोलंदाजीच्या मदतीने फलंदाजांना अगदी त्याच्या तालावर नाचवत असल्याचं पाहायला मिळालं. अशातच 16 व्या ओव्हरमध्ये कुलदीप विकेटच्या शोधात असतानाच सर्वांनाच गोंधळात टाकणारा एक चेंडू बटलरची विकेट घेऊन गेला. कुलदीपने ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना ऑफ-स्टंपच्या बाहेर वाइट लेंथ बॉल टाकला. हा बॉल अगदीच आश्चर्यकारकपणे स्पीन झाला. बटलर स्वत: हा चेंडू खेळून काढण्याच्या नादात आधीच चेंडू बाऊन्स होईल असा विचार करुन तो पुश करण्यासाठी तयार होता. मात्र चेंडू टप्पी पडल्यानंतर बाहेर जाण्याऐवजी स्टम्पकडे वळाला. कुलदीपचा चेंडू अपेक्षेप्रमाणे वाईडवरुन ऑफ स्टम्पच्या बाहेर जाईल असं वाटत असतानाच अचानक तो मिडल स्टम्पला जाऊन धडकला. अपेक्षित मार्ग आणि चेंडू स्पीन झाल्याचा मार्ग यामध्ये तब्बल 7.2 अंशांचा फरक होता. कुलदीपचा चेंडू बटलरला खेळताच आला नाही. स्टम्प उडाल्यानंतर तो हताश होऊन बॅटवर जोर देत काही क्षण क्रीजवरच मान खाली घालून उभा होता.


बटलरच्या 'विकेटचं' बाबर कनेक्शन 


कुलदीपने टाकलेला हा बॉल यंदाच्या वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम बॉल होता अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. या बॉलला अनेकांनी बॉल ऑफ द वर्ल्ड कप असंही म्हटलं आहे. मात्र कुलदीपने अशाप्रकारे फलंदाजाला चकवा देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये कुलदीपने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये बाबर आझमचीही अशीच दांडी गुल केली होती. त्यावेळेस बाबर आझमही अशाच प्रकारे डोळे मोठे करुन पाहत राहिला होता. तुम्हाला कुलदीपची ही गोलंदाजी कशी वाटली कमेंट करु नक्की सांगा.