29 ऑगस्टलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन?
National Sports Day 2024 : 29 ऑगस्टलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन? मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा विश्वातील योगदानाच्या सन्मानाप्रीत्यर्थ ; त्यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट हा दिवस `राष्ट्रीय क्रीडा दिन` म्हणून साजरा केला जातो. वेगवेगळ्या कार्यक्रमांधून त्यांनी खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल जागृती निर्माण केली.
हॅाकीचा जादूगार
मेजर ध्यानचंद यांनी हॅाकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून क्रीडा जगतात भारत देशाची मान अभिमानाने उंचावली. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना 'हॅाकीचा जादूगार' म्हणूनदेखील संबोधलं जातं. मेजर ध्यानचंद यांच्या नावाशिवाय हॅाकी क्षेत्राचा इतिहास पूर्ण होत नाही. त्यांनी आपल्या उत्तम खेळातून भारताची हॅाकी विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली. ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 ला झाला. त्यांच मूळ नाव 'ध्यान सिंग' होतं. त्यांना लहानपणापासूनच खेळ खेळायला आवडत असे. वयाच्या सोळाव्या वर्षी ध्यानचंद सिंग भारतीय सैन्यात दाखल झाले. त्या काळात हॅाकीविषयीची माहिती आणि सामग्री उपलब्ध नसतानाही ध्यानचंद मैदानात पराक्रम गाजवून सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून ओळखले जातं होते.
हेही वाचा : 'शुभमनला पुढचा विराट म्हणतात पण...'; 'मीच क्रिकेटचा देव' म्हणत कोहली हे काय बोलला?
कार्यकाळ
ध्यानचंद भारतीय हॅाकी संघाचे प्रमुख सदस्य होते. 1928, 1932 आणि 1936 च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या दमदार खेळीमुळे भारताला पहिल्यांदा 3 सुवर्णपदक मिळाली. त्यांचा हॅाकी क्षेत्रातील कार्यकाळ 1926 ते 1948 होता.
1956 साली भारतीय सैन्याच्या पंजाब लष्करी तुकडीतून सेवानिवृत्त झाल्यावर पद्मभूषण पुरस्काराने ध्यानचंद यांना गौरविण्यात आलं. 2012 पासून त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा करावा असा निर्णय भारत सरकारने घेतला.
या दिवशी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कारानं खेळाडूंना सन्मानित केलं जातं. त्याचप्रमाणे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा मानाचा सर्वौच्च पुरस्कारदेखील दिला जातो. 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाचं औचित्य साधून 'खेलो इंडिया' सारख्या क्रीडा योजना जाहीर केल्या.