India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडसमोर डोंगराएवढं आव्हान ठेवलंय. यशस्वी जयस्वालनंतर शुभमन गिलने (Shubman Gill Century) शतक ठोकत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणलंय. शुभमन गिलने 147 चेंडूत 11 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने शुभमन गिलने झुंजावती खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या डावात 255 धावा करता आल्या. शुभमनच्या या शतकीय कामगिरीचं सध्या कौतूक होताना दिसतंय. अशातच आता शतक ठोकलंय तरी देखील शुभमनला वडिलांची भीती वाटतीये? त्याचं नेमकं कारण काय? शुभमन असं का म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिल काय म्हणाला?


शतक ठोकल्यावर नक्कीच मला आनंद झाला. पण मी जरा आऊट झालो त्यावर मला नाराजी देखील वाटत आहे. बॉल जेव्हा पॅडला लागला तेव्हा मला ते जाणवलं नाही. त्यावेळी श्रेयस अय्यरने मला रिव्ह्यू घेण्याचा सल्ला दिला. मी पॉइंट फिल्डरला जाताना पाहिलं तेव्हा मला वाटलं की हा शंभर टक्के बॉल खेळू शकतो. चहापानापर्यंत मी फक्त 5 ते 6 ओव्हर खेळायला पाहिजे होत्या. अशा विकेटवर खूप बारकाईने लक्ष देऊन खेळावं लागतं. काहीवेळा बॉल नॉर्मल राहतो. तर काहीवेळा बॉल खाली राहतो, असं शुभमन गिल म्हणाला. त्यावेळी त्याने भीती देखील व्यक्त केली.


मी ज्याप्रकारे बाद झालो, त्यावरून मला वडील ओरडतील, आता ते हॉटेलवर गेल्यावर कळेल की वडील ओरडणार आहेत की नाही, असं शुभमन हसत हसत म्हणाला. माझा गेम पाहण्यासाठी ते येतात. त्यामुळे कोणतंही प्रेशर नसतं, असं शुभमन म्हणतो. तिसऱ्या दिवसानंतर 70-30 अशी परिस्थिती आहे. म्हणजेच भारताच्या विजयाची शक्यता जास्त आहे. उद्याचं सकाळचं सत्र महत्त्वाचं असेल, असं शुभमन गिलने म्हटलं आहे.



दरम्यान, पहिल्या डावात यशस्वी जयस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 396 धावांची मोठी आघाडी उघडली होती. त्यानंतर इंग्लंडच्या पहिल्या डावात टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली. इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर खल्लास झाला. त्यामुळे टीम इंडियाला 143 धावांची आघाडी मिळाली होती. अशातच आता दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या शतकीय खेळीमुळे टीम इंडियाला 255 धावा करता आल्या. त्यामुळे आता 67 धावांवर खेळ सुरू असलेल्या इंग्लंडला विजयासाठी 332 धावांची गरज आहे.