मुंबई : वर्ष 2000, दिवस 29 ऑक्टोबर....ठिकाण - शारजाह.... तमाम भारतीय क्रिकेट चाहते मोठ्या विजयाची किंवा विजेतेपदाची वाट पाहत होते, पण सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि विनोद कांबळी यांसारख्या दिग्गजांनी सजलेला भारतीय संघ एकदिवसीय सामन्यात अवघ्या 54 धावांत आटोपला जाईल, तेही चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 धोक्यात असताना, क्वचितच कोणी विचार केला असेल. पण ते घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध 245 धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या सामन्याला 21 वर्षे उलटून गेली आहेत पण क्वचितच कोणत्याही भारतीय क्रिकेट चाहत्याला तो दिवस आठवायला आवडेल. त्या डे-नाईट मॅचमध्ये भारताची अशी अवस्था होईल, याचा कुणीच विचार केला नव्हता. टीम इंडिया 300 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना केवळ 30 रन्सवर 5 विकेट पडल्या होत्या. एवढेच नाही तर केवळ 1 फलंदाज रॉबिन सिंगला दुहेरी आकडा गाठता आला होता.


श्रीलंकेने 245 धावांनी जिंकलेला सामना


शारजाहमध्ये 29 ऑक्टोबर 2000 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला गेला. श्रीलंकेचा कर्णधार सनथ जयसूर्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जयसूर्या ओपनिंगला उतरला त्याने प्रत्येक भारतीय गोलंदाजाला प्रचंड त्रास दिला. जयसूर्याच्या (189) उत्तम खेळीमुळे श्रीलंकेने 50 ओव्हर्समध्ये 5 बाद 299 धावा केल्या. 


300 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 26.3 ओव्हर्स खेळू शकला आणि अवघ्या 54 धावांत सर्वबाद झाला. श्रीलंकेने हा सामना 245 धावांच्या विक्रमी फरकाने जिंकला आणि ट्रॉफीवर कब्जाही केला.


भारताविरुद्धचा सर्वात मोठा वनडे विजयाचा विक्रम


एकदिवसीय क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत भारताविरुद्धच्या सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम श्रीलंकेने केला, जो आजही अबाधित आहे. इतकंच नाही तर वनडेमधली ही भारताची सर्वात कमी धावसंख्या आहे. हा लज्जास्पद विक्रम आजही कायम आहे. याआधी 1981मध्ये सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 63 धावांत गुंडाळलं होतं.