मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे. स्टीव्ह स्मिथनं आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. स्मिथऐवजी आता अजिंक्य रहाणेकडे राजस्थानच्या टीमचं नेतृत्व असेल.


डेव्हिड वॉर्नरवरही टांगती तलवार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टीव्ह स्मिथनंतर आता सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरवरही टांगती तलवार कायम आहे. बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं वॉर्नरवरही कारवाई केली आहे. वॉर्नरला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यामुळे सनरायजर्स हैदराबादही असाच निर्णय घेणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. डेव्हिड वॉर्नरनं कर्णधारपद सोडलं तर शिखर धवनकडे हैदराबादचं नेतृत्व जाऊ शकतं. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये पहिला सामना ९ एप्रिलला होणार आहे.


ऑस्ट्रेलियाचे सीईओ दक्षिण आफ्रिकेला रवाना


या सगळ्या प्रकारानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. या सगळ्या प्रकरणाची एका समितीमार्फत चौकशी सुरु आहे. ही चौकशी बुधवारपर्यंत पूर्ण होईल त्यानंतर स्मिथ आणि वॉर्नरबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती सदरलँड यांनी दिली आहे.


स्मिथ-वॉर्नरवर कायमची बंदी?


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दोन्ही खेळाडूंवर आयुष्यभरासाठीही बंदी घालू शकते, अशी बातमी क्रिकइन्फो या वेबसाईटनं दिली आहे.


बॉल कुरतडल्याच्या वादामुळे गाजलेली तिसरी टेस्ट दक्षिण आफ्रिकेनं तब्बल ३२२ रन्सनी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या ४३० रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम १०७ रन्सवर ऑल आऊट झाली.


वादामुळे गाजली टेस्ट


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला धक्का बसला आहे. या दोघांनाही त्यांच्या पदावरून डच्चू देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं घेतला आहे. तर स्टिव्ह स्मिथवर आयसीसीनंही कारवाईचा बडगा उचलला आहे. स्मिथचं एका टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं आहे. तसंच त्याची १०० टक्के मॅच फी देखील कापण्यात आली आहे.


स्मिथची कबुली


ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं. तिसऱ्या दिवशी लंच सुरु असताना बॉलची छेडछाड करण्याचं वरिष्ठ खेळाडूंनी ठरवल्याचं स्मिथनं मान्य केलं. लंचमध्ये झालेल्या बैठकीत स्मिथ आणि वॉर्नर असल्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली.


अशी झाली बॉलशी छेडछाड


दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.


बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या बॉलशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.