कोलंबो : भारत आणि श्रीलंकेमधल्या २०११ वर्ल्ड कप फायनलची चौकशी करण्याची तयारी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दयाश्री जयशेखर यांनी दाखवली आहे. या मॅचबद्दल लेखी तक्रार आली तर त्याची चौकशी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दयाश्री यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०११च्या वर्ल्डकपमधील फायनल मॅच फिक्स होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगांनी केली होती.


५३ वर्षीय रणतुंगा यांनी फेसबुकवर याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हि़डिओमध्ये त्यांनी वर्ल्डकपची फायनल मॅच फिक्स होती असा आरोप केलाय. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची त्यांनी मागणी केलीये.


२०११च्या वर्ल्डकप फायनलच्यावेळी मी भारतात कॉमेंट्री करत होतो. जेव्हा आमच्या संघाचा पराभव झाला तेव्हा मला दु:ख झाले होते त्यासोबतच संशयही आला होता. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी आता सर्व खुलासे करणार नाही मात्र एके दिवशी याप्रकरणावरुन जरुर पडदा उठवेन. याचा तपास होणे गरजेचे आहे, असे रणतुंगा म्हणालेत.


२०११मधील वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये भारताने श्रीलंकेला सहा विकेट्सनी हरवले होते. श्रीलंकाने या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना ५० ओव्हरमध्ये २७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना लवकर बाद करत श्रीलंकेने सामन्यावर पकड बनवली होती. मात्र त्यानंतर भारताने जबरदस्त कामगिरी करताना सामना आपल्या बाजूने झुकवला. भारताने या सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवला.