T20 WC: इंग्लंडला धूळ चारण्यासाठी आम्ही तयार; सेमीफायनलपूर्वी `या` खेळाडूचं वक्तव्य
टी-20 वर्ल्डकपमध्ये बुधवारी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनल रंगणार आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्डकपमध्ये बुधवारी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनल रंगणार आहे. यासाठी दोन्ही संघ तयारीत व्यस्त आहेत, न्यूझीलंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने यावेळी न्यूझीलंडच्या रणनीतीबद्दल सांगितलं. एकदिवसीय वर्ल्डकपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला न्यूझीलंड घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट म्हणाला की, आमचा संघ इंग्लंडला खडतर स्पर्धा देण्यासाठी सज्ज आहे.
इंग्लंडबाबत ट्रेंट बोल्ट म्हणाला की, इंग्लंज खूप संतुलित संघ आहे. तो संघ नेहमी सतत चांगलं क्रिकेट खेळतो. आम्ही आमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो कारण इंग्लंडने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये बरीच सुधारणा केली आहे.
न्यूझीलंडचा खेळाडू लॉकी फर्ग्युसन टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर गेला आहे. हे खूप दुःखद आहे, पण अॅडम मिल्नेने खूप चांगली कामगिरी केली आहे. अॅडमने या दबावाच्या परिस्थितीत स्वत:ला चांगले तयार केलं असल्याचं बोल्टने सांगितलं आहे.
इंग्लंडने T-20 वर्ल्डमध्ये 2021 मध्ये शानदार खेळ दाखवला आणि मोठ्या संघांना पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ फक्त पाकिस्तानकडून हरला आहे आणि उर्वरित संघांना पराभूत केलं आहे.
इंग्लंडने यापूर्वी देखील टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे. तर न्यूझीलंड अजूनही विजेतेपदापासून दूर आहे. या स्पर्धेत इंग्लंडने 5 सामने खेळले, त्यापैकी 4 जिंकले आणि एक सामना गमावला. न्यूझीलंडचीही ही अवस्था आहे, त्यांनीही ५ सामने खेळले आहेत आणि चार जिंकले आहेत.