दुबई : २०२१ साली होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची आयसीसने घोषणा केली आहे. जगातल्या टॉप-८ टीममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारताला थेट प्रवेश देण्यात आलेला नाही. ६ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कपचे ३१ सामने होणार आहेत. ऑकलंड, हॅमिल्टन, टॉरंगा, वेलिंग्टन, क्राईस्टचर्च आणि ड्यूनडीन या ६ शहरांमध्ये वर्ल्ड कपच्या मॅच खेळवल्या जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीच्या नियमांनुसार वर्ल्ड कपमध्ये आयोजक देश आणि वनडे इंटरनॅशनल चॅम्पियनशीपमधल्या टॉप-४ टीम अशा एकूण ५ टीमना थेट प्रवेश दिला जातो. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वादामुळे पाचव्या टीमचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.


आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आयोजक न्यूझीलंड, पहिल्या क्रमांकावर असलेली ऑस्ट्रेलिया, तिसऱ्या क्रमांकावरची इंग्लंड आणि पाचव्या क्रमांकावर असलेली दक्षिण आफ्रिका यांना वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे.


भारतीय टीम पाकिस्तानविरुद्ध खेळत नसल्यामुळे भारताला आवश्यक असलेले पॉईंट्स मिळालेले नाहीत. वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळण्यासाठी बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अर्ज केला आहे.


भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीमना समान पॉईंट्स द्यावेत, अशी मागणी बीसीसीआयने केली आहे. भारत सरकार परवानगी देत नसल्यामुळे आम्ही पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळत नाही, असं कारण बीसीसीआयने दिलं आहे. तर दुसरीकडे भारत मॅच खेळायला तयार नसल्यामुळे हे सगळे पॉईंट्स आम्हाला द्यावेत, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा वाद आता आयसीसीच्या कोर्टात आहे. भारत आणि पाकिस्तान यांना समान पॉईंट्स द्यायचा निर्णय आयसीसीने घेतला, तर भारत वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करणारा पाचवा देश ठरेल. आयसीसीने भारत-पाकिस्तानमधली सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेतला, तरीदेखील याचा भारतालाच फायदा होणार आहे, कारण दोन्ही टीमना याचे पॉईंट्स दिले जाणार नाहीत.


दुसरीकडे आयसीसीने भारत-पाकिस्तान सीरिजचे हे पॉईंट्स पाकिस्तानला द्यायचा निर्णय घेतला, तर मात्र पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करणारी पाचवी टीम ठरेल. पाकिस्तानचा वर्ल्ड कपमध्ये प्रवेश झाला, तर भारताला वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळणार नाही. अशा परिस्थितीत भारताला वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करण्यासाठी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धा खेळावी लागेल. ही स्पर्धा जुलै महिन्यात श्रीलंकेमध्ये होणार आहे. वर्ल्ड कप क्लवालिफायर स्पर्धेत टॉप-३ मध्ये आल्यास भारताला वर्ल्ड कपचं तिकीट मिळेल.


२०२१ सालचा महिला वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. या फॉरमॅटनुसार लीग स्टेजमध्ये सगळ्या ८ टीम एकमेकांविरुद्ध खेळतील. लीग स्टेज संपल्यानंतर टॉप-४ टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. सेमी फायनल जिंकणाऱ्या दोन टीममध्ये ७ मार्च २०२१ साली फायनल खेळवली जाईल.


नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पावसामुळे मॅच रद्द झाल्यामुळे भारताला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळाला होता. राखीव दिवस ठेवला नसल्यामुळे आयसीसीवर टीका झाली होती. यानंतर आता २०२१ वर्ल्ड कपच्या सेमी फायनल आणि फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.