लंडन : वर्ल्ड कप स्पर्धा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली असतानाच डोपिंगचा डाग लागला आहे. इंग्लंडचा क्रिकेटपटू ऍलेक्स हेल्स उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या उत्तेजक चाचणीमध्ये ऍलेक्स हेल्स दोषी आढळला होता. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याचं २१ दिवसांसाठी निलंबन केलं. पण माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट रसिक या कारवाईबद्दल असंतुष्ट होते. हेल्सवर यापेक्षा आणखी कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍलेक्स हेल्सला टीममधून डच्चू देण्यात आल्याची माहिती ईसीबीने दिली आहे. ईसीबीचे मॅनेजिंग डायरेक्टर ऍश्ले जायल्स आणि निवड समितीचे अध्यक्ष एड स्मिथ यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. ऍलेक्स हेल्स टीममध्ये असला तर कारण नसताना वाद निर्माण होतील, यामुळे टीमचं लक्ष भटकू शकतं. वर्ल्ड कपआधी या वादामुळे टीमला नुकसान होऊ नये, म्हणून ईसीबीने हा निर्णय घेतला आहे. 


३० वर्षांच्या ऍलेक्स हेल्सला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सीरिजमधूनही काढून टाकण्यात आलं आहे. ऍलेक्स हेल्सने इंग्लंडकडून ७० वनडे, ६० टी-२० आणि १० टेस्ट मॅच खेळल्या आहेत. आयपीएलमध्ये हेल्स मुंबई आणि हैदराबादच्या टीमकडून खेळला आहे.


उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर हेल्सच्या निलंबनाची मागणी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने केली होती. 'ऍलेक्स हेल्सने जे काही केलं, त्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. तो दुसऱ्यांदा ड्रग्ज टेस्टमध्ये दोषी आढळला आहे. वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये हेल्स अजिबात नको', असं ट्विट वॉनने केलं होतं.