World Cup 2019: वर्ल्ड कप टीममधून डच्चू...रायुडूची पहिली प्रतिक्रिया, कोणावर निशाणा?
वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची सोमवारी घोषणा करण्यात आली.
मुंबई : वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची सोमवारी घोषणा करण्यात आली. या टीममधून अंबाती रायुडू आणि ऋषभ पंत यांना डच्चू देण्यात आला. या दोघांच्याऐवजी विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली आहे. वर्ल्ड कप टीममधून डावलण्यात आल्यावर अंबाती रायुडू याने ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
'वर्ल्ड कप बघण्यासाठी नवीन थ्री डी गॉगलची ऑर्डर दिली आहे', असं ट्विट रायुडूने केलं आहे. या ट्विटमध्ये रायुडूने दोन स्माईलीही टाकल्या आहेत. या ट्विटमध्ये रायुडूने डोळा मारतानाची आणि तोंडाला पाणी सुटलेली अशा दोन स्माईली वापरल्या आहेत. पण या ट्विटमधून रायुडूला नेमकं काय म्हणायचं आहे? रायुडूला कोणावर निशाणा तर साधायचा नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विजय शंकर हा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमधून थ्री डायमेन्शनल (थ्रीडी) भूमिका बजावतो त्यामुळे विजय शंकरला प्राधान्य दिलं असल्याचं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले होते. यावरूनच रायुडूने थ्रीडीचा उल्लेख करत एमएसके प्रसाद यांच्यावर निशाणा साधल्याचा संशय काही यूजरनी रायुडूच्या ट्विटवर व्यक्त केला आहे.
खरं तर वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये दोन जागांसाठी चार खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. अंबाती रायुडू किंवा विजय शंकर आणि दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांनाच भारतीय टीममध्ये संधी मिळणार होती.
मागच्या वर्षभरामध्ये अंबाती रायुडूला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं, पण मागच्या ४ महिन्यांमध्ये रायुडूचा फॉर्म अचानक ढासळला. नोव्हेंबर २०१८ नंतरच्या १० वनडेमध्ये रायुडूला फक्त एक अर्धशतक करता आलं. या १० इनिंगपैकी ५ इनिंगमध्ये रायुडू २० पेक्षा कमी रन करून आऊट झाला. कामगिरीमधल्या या अनिश्चिततेमुळे रायुडूला संधी मिळाली नाही. वनडे क्रिकेटमध्ये रायुडूने ५५ मॅचमधल्या ५० इनिंगमध्ये ४७.०५ च्या सरासरीने १,६९४ रन केले आहेत.
अशी असणार भारतीय टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर