साऊथम्पटन : वर्ल्ड कप २०१९च टीम इंडियाचा पहिला सामना आता अवघ्या काही तासांवर आला आहे. या वर्ल्ड कपमध्ये कधी नव्हे ती टीम इंडियाची बॉलिंग मजबूत जदिसत आहे. वर्ल्ड कप मोहिमेसाठी इंग्लंडला धाडण्यात आलेल्या टीममध्ये तीन फास्ट बॉलर आणि दोन स्पिनर आहेत. याखेरीज उपयुक्त बॉलरही आपल्या ताफ्यात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या या महायुद्धात जसप्रीत बुमराह हे भारताचं प्रमुख वेगवान अस्त्र असणार आहे. फास्ट बॉलरची प्रमुख धुरा ही बुमराहवरच असणार आहे. बुमराह हा सध्याच्या घडीला वनडे क्रिकेटमधील अव्वल बॉलर आहे. त्याची अचूकता, वेग आणि भेदक मारा अफलातून आहे. अखेरच्या निर्णायक ओव्हरमध्ये त्याच्यातील खऱ्या गुणवत्तेचं आपल्याला दर्शन घडतं. त्यानं ४९ वनडे सामन्यांमध्ये ८५ बॅट्समनना आऊट केले आहेत.


बुमराहच्या जोडीला असणार आहे भुवनेश्वर कुमार आणि मोहम्दम शमी. बुमराहनंतर मोहम्मद शमी हा अजून एक भरवशाचा बॉलर आपल्याकडे आहे. एक वर्ल्ड कप खेळण्याचा अनुभव शमीकडे आहे. दुखापतींतून सावरत शमीनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली. त्याची बॉलिंगची शैली आणि त्याची कणखर मानसिकता ही भारतीय टीमसाठी जमेची बाजू आहे. भुवनेश्वरनं १०५ मॅचमध्ये ११८ विकेट घेतल्या आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये भुवीनं चांगली कामगिरी केली. इंग्लंडमधील वातावरणही भुवीच्या बॉलिंग शैलीसाठी उपयुक्त आहे.


भारताच्या स्पिनरनाही या वर्ल्ड कपमध्ये आपली छाप सोडण्याची नामी संधी आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा या दोघांचीही शैली वेगळी आहे. चायनामन कुलदीप यादवच्या फिरकीचा सामना करणं अवघड आहे. अगदी आशियाई खंडातील टीमनाही कुलदीपच्या फिरकीचं उत्तर सापडत नाही. तर जाडेजाच्या डावखुऱ्या माऱ्यापुढे अनेक बॅटसमनची भंबेरी उडते.


याखेरीज हार्दिक पांड्या आणि विजय शंकर यांच्यासारखे मध्यमगती बॉलर तर केदार जाधव हा पार्ट टाईम स्पिनर विराटच्या हाताशी आहेच. क्रिकेटच्या या महायुद्धात असलेल्या या अस्त्रांचा कसा वापर करायचा हे सांगायला विराटला धोनीची मदत नक्कीच मिळेल.