World Cup 2019 : क्रिस गेलची विक्रमाला गवसणी
वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.
नॉटिंगहम : वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पाकिस्तानने ठेवलेलं १०६ रनचं आव्हान वेस्ट इंडिजने फक्त १३.४ ओव्हरमध्येच पूर्ण केलं. वेस्ट इंडिजकडून क्रिस गेलने ३४ बॉलमध्ये सर्वाधिक ५० रन केले. गेलच्या या खेळीमध्ये ६ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता.
क्रिस गेलने या मॅचमध्ये मारलेल्या दुसऱ्या सिक्ससोबतच विक्रमाला गवसणी घातली. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आता क्रिस गेलच्या नावावर आहे. क्रिस गेलने वर्ल्ड कपमध्ये ३९ सिक्स मारले आहेत. गेलच्या खालोखाल एबी डिव्हिलियर्स (३७ सिक्स), रिकी पाँटिंग (३१ सिक्स), ब्रेन्डन मॅक्कलम (२९ सिक्स) आणि हर्षल गिब्स (२८ सिक्स) या खेळाडूंचा क्रमांक लागतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रमही क्रिस गेलच्या नावावर आहे. काहीच दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजदरम्यान गेलने हा विक्रम केला. ४४४व्या मॅचमध्ये गेल हा आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू बनला. याआधी शाहिद आफ्रिदीच्या नावावर हा विक्रम होता. आफ्रिदीने ५२४ मॅचमध्ये ४७६ सिक्स मारले होते.
वनडेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड अजूनही शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. शाहिद आफ्रिदीने वनडेमध्ये ३५१ सिक्स मारले, तर या यादीत क्रिस गेल ३१५ सिक्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये क्रिस गेलने ३०० सिक्सचा टप्पा गाठला होता. आयपीएलमध्ये ३०० सिक्स गाठणारा गेल हा पहिला खेळाडू आहे.