World Cup 2019 : इंग्लंडच्या त्या दोन खेळाडूंनी अर्ध्यातच सेलिब्रेशन सोडलं
२०१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला
लंडन : २०१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली मॅच टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली. त्यामुळे मॅचमध्ये सर्वाधिक बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. आणि इंग्लंडने पहिल्यांदाच ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी मैदानात जोरदार सेलिब्रेशन केलं.
मैदानात इंग्लंडच्या खेळाडूंनी शॅम्पेन उडवत आपला विजय साजरा केला. पण या सेलिब्रेशनमधून इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी पळ काढला. आदिल रशिद आणि मोईन अली हे दोघं सेलिब्रेशन अर्ध्यातच सोडून निघून गेले. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ ट्विटरवर इमाम तवाहिदि याने शेअर केला आहे. इमाम तवाहिदी हे इस्लाम धर्मातील अतिरेकी कट्टरपंथीयांचे विरोधक आहेत. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करताना लिहिलं आहे की, 'ब्रिटिश मुस्लिम क्रिकेटपटू शँपेन पाहून पळून गेले. हा प्रकार हास्यास्पद आहे. हे सर्व पाहून मला माझं हसू अनावर झालं.'
वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटो काढण्यासाठी इंग्लंडचे सर्व खेळाडू जमले होते. त्याच वेळी इंगलंडच्या काही खेळाडूंनी शॅम्पेनच्या बॉटल ऊघडून शॅम्पेन हवेत उडवली. हा सर्व प्रकार पाहून मोईन अली आणि आदिल रशीद हे स्पष्टपणे पळ काढताना दिसत आहेत. इस्लाम धर्मामध्ये दारू व्यर्ज असल्यामुळे या दोन्ही क्रिकेटपटूंनी शॅम्पेनपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. अनेक मुस्लिम क्रिकेटपटू दारूची जाहिरात असलेली जर्सी वापरत नाहीत.