नॉटिंगहम : वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये १०५ रनवर ऑल आऊट झालेल्या पाकिस्तानी बॅट्समननी दुसऱ्या मॅचमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानने ५० ओव्हरमध्ये ३४८ रन केले आहेत. या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानचे ओपनर इमाम उल हक आणि फकर झमान यांनी आक्रमक सुरुवात केली. १४ ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या ओपनरनी ८२ रनपर्यंत मजल मारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फकर झमान ३६ रनवर आणि इमाम उल हक ४४ रनवर आऊट झाले. बाबर आझम, मोहम्मद हफीज आणि सरफराज अहमद यांनी पाकिस्तानच्या इनिंगला आकार दिला. बाबर आझमने ६३ रन, मोहम्मद हाफिजने सर्वाधिक ८४ रन आणि सरफराज अहमदने ५५ रन केले.


इंग्लंडकडून क्रिस वोक्स आणि मोईन अली यांनी सर्वाधिक ३-३ विकेट घेतल्या. मार्क वूडला २ विकेट घेण्यात यश आलं.


वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला होता, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये इंग्लंडने मोठा विजय मिळवला होता. याआधी काहीच दिवसांपूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वनडे सीरिज झाली होती. या वनडे सीरिजच्या सगळ्या ४ मॅच इंग्लंडने जिंकल्या होत्या, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती. या चारही मॅचमध्ये स्कोअर ३०० पेक्षा जास्त झाला होता.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा