मॅनचेस्टर : इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने वनडे क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. इयन मॉर्गनने वनडेत एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचं रेकॉर्ड केलं आहे. वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये मॉर्गनने तब्बल १७ सिक्स लगावले. या मॅचमध्ये मॉर्गनने ७१ बॉलमध्ये १४८ रनची विस्फोटक खेळी केली. मॉर्गनच्या या खेळीमध्ये १७ सिक्ससोबतच ४ फोरचाही समावेश होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 


इयन मॉर्गनने १७ वा सिक्स मारताच वनडेमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. याआधी वनडेच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ नोव्हेंबर २०१३ ला हा रेकॉर्ड केला होता. त्यावेळेस रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार द्विशतक लगावले होते. रोहितने २०९ रनची खेळी केली होती. यात त्याने १२ फोर आणि १६ सिक्स मारले होते. ही मॅच बंगळुरु येथे खेळण्यात आली होती


रोहित शर्माच्या तुलनेत इयन मॉर्गनने ६१ रन कमी केल्या आहेत. तरीदेखील इयन मॉर्गनचे सिक्स सर्वाधिक आहेत.


रोहित शर्माबरोबरच क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स यांनीही एका वनडे इनिंगमध्ये १६ सिक्स लगावले होते. तर शेन वॉटसनने १५ सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला होता. क्रिस गेलने २०१५ वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध, एबी डिव्हिलियर्सने २०१४ साली वेस्ट इंडिजविरुद्ध १६ सिक्स लगावले. तर शेन वॉटसनने २०११ साली बांगलादेशविरुद्ध १५ सिक्स मारले होते.


दरम्यान इयन मॉर्गनच्या १४८ रनच्या दमदार खेळीच्या आधारावर इंग्लंडने ५० ओव्हरमध्ये ३९८ रन केले आहेत. त्यामुळे दुबळ्या अफगाणिस्तानला विजयासाठी ३९९ रनचे अवघड आव्हान मिळाले.