World Cup 2019 : ऋषभ पंतच्या त्या ट्विटवर चाहते भडकले
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला.
मॅनचेस्टर : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा १८ रननी पराभव केला. न्यूझीलंडने दिलेल्या २४० रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था २४/४ अशी झाली होती. यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांच्यात ४७ रनची पार्टनरशीप झाली. पण ऋषभ पंत खराब शॉट मारून आऊट झाला.
मॅचनंतर ऋषभ पंतने केलेल्या ट्विटवर चाहते चांगलेच भडकले. 'माझा देश, माझी टीम, माझा सन्मान. संपूर्ण देशाने जो विश्वास दाखवला आणि प्रेम दिलं, त्यासाठी धन्यवाद. आम्ही जोरदार पुनरागमन करू,' असं ट्विट पंतने केलं.
ऋषभ पंतच्या या ट्विटवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. ऋषभ पंतच्या खराब शॉटमुळेच टीम इंडियाचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया अनेक यूजर्सने दिली.
ऋषभ पंतची विकेट गेल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये बसलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली प्रशिक्षक रवी शास्त्रीकडे गेला आणि काहीतरी म्हणाला. यावेळी विराट कोहलीच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता.
रवी शास्त्रींकडे जाऊन आपण काय बोललो याचा खुलासा विराटने मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत केला आहे. 'नेमकं काय चाललं आहे? आता पुढची रणनिती काय असणार आहे? मैदानात नेमका काय संदेश पाठवायचा आहे? असे प्रश्न मी तेव्हा शास्त्रीला विचारले,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
'मला आणि रोहित शर्माला पडलेला बॉल हा उत्कृष्ट होता, पण टीममधल्या काही खेळाडूंनी खराब शॉट खेळले. ऋषभ पंतला त्याची चूक लक्षात आली,' असं वक्तव्य विराट कोहलीने केलं.