लंडन : वर्ल्ड कपच्या अत्यंत रोमांचक अशा फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातला हा सामना टाय झाल्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली, पण सुपर ओव्हरही टाय झाली. अखेर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त फोर मारल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. फोरच्या नियमावर इंग्लंडचा विजय झाल्यामुळे अनेक क्रिकेट रसिकांनी आयसीसीवर सडकून टीका केली आहे. त्यातच आता आयसीसीचे माजी अंपायर सायमन टॉफेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या शतकातले सर्वोत्तम अंपायर म्हणून सायमन टॉफेल यांची गणना होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडला शेवटच्या ३ बॉलमध्ये विजयासाठी ९ रनची गरज होती. यावेळी स्टोक्सने दोन रन घ्यायचा प्रयत्न केला. दुसरी रन काढताना न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलने केलेला थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागला आणि फोर गेली. यानंतर अंपायर कुमार धर्मसेना यांनी सहा रन द्यायचा निर्णय घेतला.


सायमन टॉफेल यांनी अंपायरनी घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणलं आहे. एमसीसी ही संस्था क्रिकेटचे नियम बनवते. सायमन टॉफेल हे एमसीसीच्या या उपसमितीचे सदस्या आहेत.


'एमसीसीच्या नियमानुसार त्यावेळी मैदानातल्या अंपायरनी इंग्लंडला ६ ऐवजी ५ रनच दिल्या पाहिजे होत्या. अंपायरनी स्टोक्सची पहिली रन आणि ओव्हर थ्रोच्या ४ रन अशा एकूण ५ रन देणं आवश्यक होतं. तसंच दुसरी रन पूर्ण न झाल्यामुळे बेन स्टोक्स नॉन स्ट्रायकर एन्डला जाणं अपेक्षित होतं', असं सायमन टॉफेल म्हणाले.


काय आहे आयसीसीचा नियम?


- आयसीसीच्या १९.८ नियमानुसार जर ओव्हर थ्रोमुळे बॉल बाऊंड्रीवर जात असेल तर त्यामध्ये बॅट्समनने पूर्ण केलेल्या रन जोडल्या जातात. 


- जर बॅट्समननी थ्रो करायच्या आधी एकमेकांना क्रॉस केलं तर ओव्हर थ्रोमध्ये त्या रनही जोडल्या जातील.


- जर फिल्डरने थ्रो फेकायच्या आधी बॅट्समननी एकमेकांना क्रॉस केलं नसेल, तर ती रन जोडली जाणार नाही. 


या परिस्थितीमध्ये मार्टिन गप्टीलने जेव्हा थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स आणि आदिल रशीद यांनी दुसऱ्या रनसाठी एकमेकांना क्रॉस केलं नव्हतं. तरीही अंपायरनी इंग्लंडला २ रन आणि ओव्हर थ्रोच्या ४ रन अशा एकूण ६ रन दिल्या.


कुमार धर्मसेना आणि मरे एरॅसमस यांनी एमसीसीच्या या नियमाप्रमाणे निर्णय घेतला असता तर इंग्लंडला विजयासाठी २ बॉलमध्ये ४ रनची गरज असती, तसंच बेन स्टोक्स नॉन स्ट्रायकर एन्डला गेला असता. पण अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे स्टोक्स स्ट्राईकवर आला आणि इंग्लंडचं आव्हान २ बॉलमध्ये ३ रन एवढं झालं.


अंपायरनी ही चूक केली असली तरी सायमन टॉफेल यांनी धर्मसेना आणि एरॅसमस यांची पाठराखण केली आहे. या गोष्टी इतक्या काही क्षणात घडल्यामुळे हा गोंधळ अंपायरच्या लक्षात आला नाही, पण यामुळे मॅचच्या निकालावर परिणाम झाल्याचं टॉफेल यांनी मान्य केलं.


सायमन टॉफेल यांना ५ वेळा आयसीसी अंपायर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.