मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला रवाना होण्याआधी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. वर्ल्ड कपमध्ये भारताच्या सुरुवातीच्या ४ मॅच कठीण असल्याची कबुली विराट कोहलीने दिली. या चारही मॅच कठीण असल्यामुळे कोणत्याही चुकांना जागा नाही. पण कठीण मॅच असल्यामुळेच हा वर्ल्ड कप आहे, असं वक्तव्य विराट कोहलीने केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपमध्ये भारताच्या पहिल्या चार मॅच या दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या टीमविरुद्ध आहेत.


इंग्लंडमधल्या वातावरणापेक्षा तणावात कोणती टीम कसं खेळते हे महत्त्वाचं आहे. तणाव न घेता नेहमीप्रमाणे खेळण्याचा आमचा प्रयत्न असेल. जी टीम तणाव न घेता मॅचवर लक्ष केंद्रीत करेल, ती टीम पुढे जाईल, असं मत विराटने व्यक्त केलं.


फॉर्ममध्ये नसलेल्या केदार जाधव आणि कुलदीप यादव यांचीही विराटने पाठराखण केली आहे. एवढं क्रिकेट खेळल्यानंतर काही वेळा गोष्टी तुमच्या विरुद्ध जातात. कुलदीपसोबतही तसंच झालं आहे. पण आयपीएलमध्ये त्याचा फॉर्म ढासळल्यामुळे चांगलं झालं. या कालावधीमध्ये त्याला विचार करायला वेळ मिळाला. त्यामुळे तो वर्ल्ड कपमध्ये मजबूत मानसिकता घेऊन येईल. कुलदीप-चहल भारतीय बॉलिंगचे आधारस्तंभ आहेत, असं विराट म्हणाला.


केदार जाधवच्या आयपीएलमध्ये रन झाल्या नाहीत, पण तो चेन्नईच्या खेळपट्टीवर खेळत होता, हे विसरून चालणार नाही. केदार जाधव हा सध्या चांगल्या मानसिकतेमध्ये आहे, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.


आमचे सगळे बॉलर फ्रेश आहेत. आयपीएलमध्येही खेळाडूंचं ध्येय आणि लक्ष वर्ल्ड कपवरच होतं. आयपीएलमध्येही ते ५० ओव्हर खेळण्याच्या मानसिकतेत होते, त्यामुळे ४ ओव्हर टाकल्यानंतरही ते दमलेले दिसले नाहीत. आम्हाला कोणत्याच खेळाडूबद्दल चिंता नाही, कारण प्रत्येक खेळाडूमध्ये आत्मविश्वास आहे, असं विराटने सांगितलं.


इंग्लंडमधलं वातावरण आणि खेळपट्ट्यांमुळे मोठे स्कोअर होतील. वर्ल्ड कपसाठी प्रतिस्पर्धी टीमपेक्षा आपल्या टीमच्या क्षमतेनुसार खेळावं लागेल, असं मत विराटने व्यक्त केलं.


वर्ल्ड कपचा आनंद घेणं महत्त्वाचं


दरम्यान वर्ल्ड कपचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे. जर आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो तर वर्ल्ड कप जिंकू शकतो. ही स्पर्धा सगळ्यात कठीण आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्तानही २०१५ पेक्षा जास्त मजबूत आहेत, असं रवी शास्त्री म्हणाले.


या वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनीची भूमिका महत्त्वाची असेल. खेळ पालटवण्याच्या त्या मोक्याच्या क्षणी धोनीपेक्षा चांगलं कोणीच नाही, अशी प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी दिली.


वर्ल्ड कपमधल्या भारताच्या मॅच


५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका


९ जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया


१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड


१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान


२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान


२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज


३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड


२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश


६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका


विराट-शास्त्रींची पत्रकार परिषद