लीड्स : वर्ल्ड कपमध्ये भारत-श्रीलंका मॅचदरम्यान नवा वाद निर्माण झाला आहे. हा वाद खेळाडूंमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे झाला आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या बॅटिंगची तिसरी ओव्हर सुरु असताना आकाशात एक विमान उडत होतं. 'जस्टीस फॉर काश्मीर' असा संदेश या विमानावर लिहिला होता. यानंतर १७व्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आकाशात एक विमान दिसलं. या विमानावरही काश्मीरबद्दल आक्षेपार्ह संदेश लिहिण्यात आला होता. भारताने हिंसाचार थांबवावा आणि काश्मीर स्वतंत्र करावं, अशी मागणी या संदेशामध्ये करण्यात आली होती.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने याप्रकरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अशाप्रकारची घटना घडण्याची या वर्ल्ड कपमधली ही पहिली वेळ नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या मॅचवेळी अशाच प्रकारे आकाशात बलूचिस्तानबद्दलचे संदेश घेऊन एक विमान फिरत होतं. तसंच स्टेडियममध्ये काही प्रेक्षक बलूचिस्तान समर्थनाचे बॅनर घेऊनही आले होते. यामुळे या मॅचमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या समर्थकांमध्ये हाणामारीच्या घटनाही झाल्या होत्या. अशा घटना रोखण्यासाठी भविष्यात प्रयत्न करु, असं आयसीसीने या प्रकारानंतर सांगितलं होतं.


आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धांमध्ये अशाप्रकारचे संदेश लिहिलेले बॅनर घेऊन जायला परवानगी नसते. स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून आम्ही हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया आयसीसीने दिली आहे.