World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय
वर्ल्ड कपच्या भारत आणि न्यूझीलंड सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आला आहे.
नॉटिंगहम : वर्ल्ड कपच्या भारत आणि न्यूझीलंड सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आला आहे. पावसामुळे अजून टॉसही पडलेला नाही. नॉटिंगहममध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज सकाळी काही वेळ पाऊस थांबला होता, पण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. यामुळे खेळपट्टीला कव्हर घालण्यात आलं आहे.
'काही वेळापूर्वी नॉटिंगहममधली परिस्थिती चांगली होती, पण पुन्हा एकदा सरी बरसायला सुरुवात झाली आहे. खेळपट्टीच्या आजूबाजूला कव्हर घालण्यात आली असली तरी मैदानात कव्हर घालण्यात आलेलं नाही. त्यामुळे मैदानातले काही भाग ओलसर आहे. वारा आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळे हा भाग वाळणं कठीण आहे,' असं ट्विट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी केलं आहे.
यंदाच्या वर्ल्ड कपमधले अनेक सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यामुळे आयसीसीला टीकेला सामोरं जावं लागत आहे. तसंच वर्ल्ड कपच्या पहिल्या फेरीत राखीव दिवस का नाही? असा प्रश्नही क्रिकेट चाहते आयसीसीला विचारत आहेत. आयसीसीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला तर स्पर्धेचा कालावधी खूप जास्त वाढेल, तसंच यासाठी लागणारी यंत्रणा आणि माणसं उपलब्ध होणंही अशक्य आहे, असं आयसीसीने सांगितलं.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कपमध्ये ७ मॅच झाल्या. यातल्या ४ मॅचमध्ये न्यूझीलंडचा आणि ३ मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे.
या मॅचमध्ये टीम इंडिया शिखर धवनशिवाय मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. शिखर धवनऐवजी केएल राहुल रोहित शर्मासोबत ओपनिंगला खेळेल हे जवळपास निश्चित आहे. पण चौथ्या क्रमांकासाठी विराट कोणाला पसंती देतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यासाठी विराटकडे दिनेश कार्तिक आणि विजय शंकर हे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
पावसामुळे मॅच कमी ओव्हरची झाली तर विराट दोन स्पिनरऐवजी फास्ट बॉलर मोहम्मद शमीला संधी देऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये कुलदीप यादवला बाहेर बसावं लागू शकतं. नॉटिंगहममध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे फास्ट बॉलरना मदत होईल, अशात मोहम्मद शमीची खेळण्याची शक्यता जास्त आहे.
भारत-न्यूझीलंडमधली मॅच पावसामुळे रद्द झाली तर दोन्ही टीमना प्रत्येकी १-१ पॉईंट देण्यात येईल. पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम पहिल्या क्रमांकावर आणि टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर आहे. ३ पैकी ३ सामने जिंकल्यामुळे न्यूझीलंडकडे ६ पॉईंट्स आहेत. तर टीम इंडियानेही त्यांचे २ पैकी २ सामने जिंकले, यामुळे त्यांच्या खात्यात ४ पॉईंट्स आहेत.
४ मॅचमध्ये ३ विजय आणि १ पराभवासह ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ६ पॉईंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाची टीम पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.